जगभरात लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा चौथा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात झाला. अकेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार मोहम्मद शमी ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, लखनऊ आणि गुजरात हे दोन्ही संघ आयपीएलच्या १५व्या हंगामात नव्याने सामील झालेले संघ आहेत. आता हा सामना जिंकत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने विजयी सुरुवात केली आहे.
नाणेफेक जिंकत गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच, लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी लखनऊने निर्धारित २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावत १५८ धावा केल्या होत्या. लखनऊकडून मिळालेले १५९ धावांचे आव्हान गुजरातने १९.४ षटकात ५ विकेट्स गमावत पार केले.
गुजरातकडून फलंदाजी करताना अष्टपैलू राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) सर्वाधिक धावा केल्या. त्याने नाबाद ४० धावा केल्या. यामध्ये २ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) ३३ धावा केल्या. त्याने १ षटकार आणि ५ चौकार ठोकले. तसेच, डेविड मिलर आणि मॅथ्यू वेड यांनी प्रत्येकी ३० धावा केल्या. शेवटी संघाचा किल्ला लढवण्यासाठी आलेल्या अभिनव मनोहरने ७ चेंडूत १५ धावा करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
यावेळी लखनऊ संघाकडून गोलंदाजी करताना दुष्मंता चमीराने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त आवेश खान, कृणाल पंड्या आणि दीपक हुड्डा यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाकडून दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) यांनी सर्वाधिक धावा केल्या होत्या. हुड्डाने ४१ चेंडूत ५५ धावा केल्या. यामध्ये २ षटकार आणि ६ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच, बदोनीने ४१ चेंडूत ५४ धावा केल्या. त्याने या धावा करताना ३ षटकार आणि ४ चौकार मारले. त्यांच्याव्यतिरिक्त कृणाल पंड्याने नाबाद २१ धावांचा योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त एकालाही २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार केएल राहुल (KL Rahul) तर सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला.
यावेळी गुजरात संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने (Mohammed Shami) सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शमीने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या. या ३ विकेट्समधील पहिली विकेट ही लखनऊचा कर्णधार केएल राहुलची होती. त्याच्याव्यतिरिक्त वरुण ऍरॉनने २, तर राशिद खानने १ विकेट आपल्या खिशात घातली.
आयपीएलच्या १५व्या हंगामातील पाचवा सामना मंगळवारी (२९ मार्च) पुण्याच्या एमएसीए स्टेडिअम येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नुसता कॅच नव्हे, शुबमन गिलने मॅच हातात घेतली? जबरदस्त ‘हवाई झेल’चा व्हिडिओ होतोय व्हायरल
व्हॉट अ स्टार्ट! शमीने सर्वांच्याच उंचावल्या भुवया, पहिल्याच चेंडूवर लखनऊचा कर्णधार ‘गोल्डन डक’
आयपीएलमध्ये इतक्या फ्रँचायझी, त्यांचे इतके बॉलर… पण शमीने गुजरातसाठी जे केले ते ऐतिहासिकच