---Advertisement---

गुजरातचा पहिला विजय; पॉइंट्स टेबलमध्ये उलथापालथ! मुंबईला 440 व्होल्टचा झटका, नंबर 1 कोण?

On: गुरूवार, एप्रिल 9, 2026 7:39 AM
---Advertisement---

गुजरात टायटन्सने आयपीएल 2026 मधील 14व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर शेवटच्या चेंडूवर 1 धावेने थरारक विजय मिळवत स्पर्धेत आपले विजयाचे खाते उघडले. बुधवारी, 8 एप्रिल रोजी झालेल्या या सामन्यात अखेरपर्यंत रंगलेल्या लढतीत दिल्लीने जिंकलेला सामना हातातून गमावला. दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकून सलग तिसरा विजय साजरा करण्याची सुवर्णसंधी होती, मात्र शेवटच्या क्षणी सामना फिरला आणि गुजरातने नाट्यमय विजय मिळवला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले, गुजरात टायटन्सने दिल्लीसमोर 211 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने सुरुवातीपासूनच चांगली झुंज दिली आणि सामना अखेरच्या क्षणापर्यंत खेचला. मात्र अखेरच्या चेंडूवर त्यांना विजयासाठी आवश्यक असलेल्या २2 धावा करता आल्या नाहीत आणि 1 धावेने पराभव स्वीकारावा लागला. याआधी दिल्लीने मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत करत चांगली लय मिळवली होती, पण या सामन्यात ती लय कायम राखण्यात अपयश आले.

या निकालाचा पॉइंट्स टेबलवरही मोठा परिणाम झाला आहे. गुजरात टायटन्सने 2 गुण मिळवत 3 स्थानांची झेप घेत थेट सहाव्या स्थानी प्रवेश केला आहे. त्यांच्या नेट रन रेटमध्येही सुधारणा झाली असून तो -0.270 इतका झाला आहे. याआधी गुजरात नवव्या स्थानी होती. शिवाय, त्यांचा नेट रन रेट -0.424 होता. या विजयासह गुजरात या मोसमात विजय मिळवणारी आठवी टीम ठरली आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सची क्रमवारी घसरून संघ आठव्या स्थानी पोहोचला आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स नवव्या आणि चेन्नई सुपर किंग्स दहाव्या स्थानी आहेत.

दिल्ली कॅपिटल्ससाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. विजय मिळवला असता तर त्यांना पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेता आली असती. मात्र पराभवानंतर दिल्ली चौथ्या स्थानी कायम आहे. त्यांनी 3 पैकी 2 सामने जिंकले असून त्यांचा नेट रन रेट +0.811 इतका आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो +1.170 होता, ज्यात या पराभवामुळे थोडी घट झाली आहे.

दरम्यान, पुढील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने येणार आहेत. हा सामना आज गुरुवारी, 9 एप्रिल रोजी खेळला जाणार असून केकेआरला या सामन्यात विजय मिळवत आपले विजयाचे खाते उघडण्याची संधी असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---