आयपीएल 2026 मधील 60व्या लीग सामन्यात आज (16 मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स हे संघ ईडन गार्डन्स मैदानावर आमनेसामने आहेत. हा सामना कोलकातासाठी प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात असला, तरी गुजरातसाठीही ही लढत तितकीच निर्णायक ठरणार आहे. आता सर्वांच्या नजरा एका प्रश्नाकडे लागल्या आहेत. कोलकात्याचा पराभव करताच गुजरात प्लेऑफमध्ये प्रवेश करणार का?
गुजरात टायटन्सने आतापर्यंत 12 सामने खेळले असून त्यापैकी 8 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 4 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. या शानदार कामगिरीमुळे संघाच्या खात्यात सध्या 16 गुण आहेत. गुणतालिकेत गुजरातचा संघ सध्या दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
आज शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने कोलकात्यावर विजय मिळवला, तर त्यांच्या खात्यात 18 गुण जमा होतील. आयपीएलच्या इतिहासात 18 गुणांसह कोणत्याही संघाचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित मानले जाते. त्यामुळे आजच्या विजयासह गुजरातच्या नावासमोर ‘Q’ म्हणजेच क्वालिफायचा शिक्का बसण्याची दाट शक्यता आहे.
विशेष म्हणजे, गुजरातने आज विजय मिळवला तर प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करणारा तो या हंगामातील पहिला संघ ठरेल. त्यामुळे गिल ब्रिगेड कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आतापर्यंत कोणत्याही संघाने अधिकृतपणे प्लेऑफमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ स्पर्धेबाहेर झाले आहेत.
सध्या उर्वरित 8 संघांमध्ये टॉप-4 साठी जबरदस्त चुरस पाहायला मिळत आहे. या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा समावेश आहे. आता या हंगामात प्लेऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.






