सोमवारी (दि. 15 मे) गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल 2023 चा 62वा सामना खेळला गेला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात गुजरात संघाने 34 धावांनी विजय मिळवला. या विजयासह गुजरात संघाने आयपीएल 2023 च्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. मात्र, या सामन्यात त्यांच्या आनंदावर विरजण टाकणारी एक गोष्ट घडली. संघाचा फिरकीपटू नूर अहमद याला दुखापत झाल्याने अर्ध्यातून सामना सोडावा लागला होता.
वेगवान गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीनंतर गुजरात हा सामना जिंकण्याच्या अगदी जवळ होती. त्यावेळी सोळावे षटक टाकत असलेल्या नूर अहमद याच्या चेंडूवर फलंदाज हेन्रिक क्लासेन याने वेगवान फटका मारला. सरळ आलेला चेंडू नूर याने पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही त्याची चूक ठरली. या फटक्यामुळे नूर याच्या पायाला जोरदार प्रहार झाला. फिजिओनी मैदानात येऊन त्याची पाहणी केली असता तो नीट चालू शकत नव्हता. अखेर त्याला संघ सहकाऱ्यांनी आधार देत मैदानाबाहेर नेले. हे षटक राहुल तेवतियाने पूर्ण केले. तत्पूर्वी, नूरने 2.5 षटकात 35 धावा देऊन एकही बळी मिळवला नव्हता.
नूर याची दुखापत गंभीर असल्यास तो गुजरात संघासाठी मोठा धक्का असेल. कारण, संघाच्या आतापर्यंतच्या यशात त्याचा सिंहाचा वाटा राहिला आहे. राशिद खानसह तो संघाच्या फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसतोय. अफगाणिस्तानचे भविष्य म्हणून ओळखल्या जात असलेल्या नूरने या हंगामात आतापर्यंत 9 सामने खेळताना आठ पेक्षा कमी धावांच्या इकॉनॉमी रेटने 11 बळी आपल्या नावे केले आहेत. तो स्पर्धेतून बाहेर झाल्यास प्ले ऑफमध्ये गुजरात संघाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
(Gujarat Titans Spinner Noor Ahmed Injured Against Sunrisers Hyderabad Big Blow For Table Toppers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरातचा विजयरथ सलग दुसऱ्या हंगामात सुसाट! पुन्हा चालली हार्दिक-नेहराजींची जादू
शमीचा ‘पर्पल पॅच’ सुरूच! सनरायझर्सला लोळवत पुन्हा बनलाय नंबर वन






