क्रिकेटविश्वातून एक मोठे वृत्त समोर येत आहे. क्रिकेट कॅनडाचे अध्यक्ष अरविंदर खोसा यांच्या घरावर बुधवारी (२० मे) पहाटे ४.४० वाजता गोळीबार झाला. त्यांचे घर कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रातांच्या सरे शहरामधील न्यूटन येथे आहे. या निवासस्थानी गोळीबार झाल्याची पुष्टी अरविंदर यांनी स्वत: केली आहे. ही घटना खंडणीशी संबंधित असल्याचे समोर येत आहे.
या भागात भारतीय वंशाचे आणि विशेषत: पंजाबी लोक मोठ्या संख्येने राहतात. गोळीबारादरम्यान घराच्या दरवाजे, खिडक्या आणि बाहेरील भिंतींवर किमान ५ गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या. या भीषण हल्ल्याच्या वेळी अरविंदर यांचे संपूर्ण कुटुंब घरात झोपलेले होते. पहाटेच्या वेळी झालेल्या या अचानक गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या म्हणण्यानुसार गोळीबाराच्या वेळी अरविंदर यांच्या घरी लोक उपस्थित होतो. पहाटे ४.४० च्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना कोणीही जखमी आढळले नाही. सरे पोलिसांची तपास सुरू केला असून ही गोळीबाराची घटना खंडणीशी संबंधित असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
क्रिकेट कॅनडाच्या मोठ्या चौकशीनंतर काही आठवड्यांतच हा हल्ला झाला आहे, ज्यामध्ये भ्रष्टाचार, संघटित गुन्हेगारी आणि मॅच-फिक्सिंगचे गंभीर आरोप झाले होते. क्रिकेट ब्रिटिश कोलंबियाचे विद्यमान अध्यक्ष अरविंदर हे देखील या चौकशीत गुंतले होते. पुढे तपासात असे उघड झाले की, अरविंदर हे स्वत:ला बिश्नोई गॅंगचे सदस्य म्हणून ओळख देणाऱ्या आणि २०२५ मध्ये कॅनेडियन राष्ट्रीय संघाच्या एका खेळाडूला धमकी दिल्याचा आरोप असलेल्या स्थानिक खेळाडूशी संबंधित होतो. हे आरोप त्यांनी फेटाळून लावले होते.






