भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी त्याची पत्नी हसीन जहाँने केलेल्या विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपावरून चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याच्या पत्नीने त्याच्यावर मॅच फिक्सिंग केल्याचाही आरोप केला आहे.
या आरोपामुळे न्यायालयाने नेमलेल्या समितीने बीसीसीआयला हे प्रकरण बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी समितीकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. पण शमीने त्याच्यावर झालेले हे मॅच फिक्सिंगचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.
शमी इंडिया न्युजशी बोलताना म्हणाला की तो देशाबरोबर फसवणूक करू शकत नाही. तसेच तो असेही म्हणाला, “जर बीसीसीआयच्या चौकशीमध्ये मी गुन्हेगार म्हणून सिद्ध झालो तर मला फाशी द्या.” त्याच्या विरोधात मॅच फिक्सिंगचे आरोप लागल्याने त्याला अश्रूही अनावर झाले.
याबरोबरच शमी म्हणला की जेव्हा पण तो मैदानावर देशाचे प्रतिनिधित्व करतो तेव्हा त्याला अभिमान वाटत असतो.
शमीच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे बीसीसीआयने शमीचा वार्षिक करारही स्थगित केला आहे. याबद्दल शमी म्हणाला, “भारतीय क्रिकेट मंडळाने गडबडीत माझा वार्षिक करार रद्द केला. मी माझा खेळ योग्य रीतीने खेळला आहे.”
शमीच्या पत्नीने त्याच्यावर अनैतिक संबंधाचे गंभीर आरोप करताना फेसबुकवर ७ ते ८ पोस्ट लिहील्या आहेत. तिने शमीच्या फेसबुक आणि वाॅट्सअॅप चटींगचेही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
२०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद शमीने हसीन बरोबर २०१४ मध्ये लग्न केले होते.