तुम्ही नुकतंच क्रिकेट पाहायला सुरू केलं असलं, किंवा मागच्या पन्नास वर्षापासून क्रिकेट फॉलो करत असला तरी, हॅन्सी क्रोनिए या नावाचा एक अख्खा अध्याय तुम्हाला माहित असायला हवा किंबहूना तुम्ही माहीत करून घ्यायला हवा. कारण, फक्त क्रिकेटरच नव्हेतर एक व्यक्ती कसा असतो?, याचं उदाहरण तुम्हाला हॅन्सी क्रोनिए समजून घेतल्यानंतर मिळेल. हिरो ते झिरो, आणि पुन्हा झिरो ते हिरो असा प्रवास हॅन्सीने फक्त ३२ वर्षाच्या आयुष्यात केला. दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधील सर्वात मोठा सुपरस्टार, आणि त्याच दक्षिण आफ्रिका क्रिकेटला बालंट लावणारा विलन. अशी दुहेरी ओळख असलेला हॅन्सी त्याच्या मृत्यूमुळे देखील तितकाच चर्चेत राहिला. आज २० वर्षानंतरही अपघात की घातपात? असा प्रश्न त्याच्या मृत्यूमुळे का विचारला जातो?, त्या हॅन्सीच्या त्या मृत्यूची कहाणी नेमकी काय होती?, याचा उलगडा करणारा हा लेख.
वर्णद्वेषामूळे बॅन झालेल्या दक्षिण आफ्रिका क्रिकेटला १९९२मध्ये पुन्हा एकदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये यायची संधी मिळाली. भारतानंच त्यांचं यजमानपद भुषवलं. त्याच संघात डेव्हलपमेंट प्लेअर म्हणून आला हॅन्सी क्रोनिए. भारतात आला तरी त्याला डेब्यू करायला, वेस्ट इंडीज सिरीजची वाट पाहायला लागली. परंतु तिथूनच वर्ल्ड क्रिकेटला हॅन्सी क्रोनिए नावाचं वादळ मिळाल. त्याच्या यशाचा झपाटा इतका होता की, अवघ्या तीन वर्षात तो साउथ आफ्रिकेचा कॅप्टन बनला. वय होतं अवघं २५ वर्ष.
क्रोनिए बॉर्न लीडर होता. नेतृत्व कसं करावं हे जणू काही तो आईच्या पोटातून शिकून आलेला. त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ यशाची शिखरे पादाक्रांत करत राहीला. स्वतः कॅप्टन रीडिंग फ्रॉम द फ्रंटचे उदाहरण घालून देत, ऑलराउंड परफॉर्मन्स करण्यात तो मागे नव्हता. १९९९ वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड चॅम्पियन, आणि क्रोनिएला वर्ल्डकप विनिंग कॅप्टन म्हणवून घ्यायची नामी संधी आलेली. मात्र, शेवटच्या बॉलवर क्लुसनर-डोनाल्डने सावळा गोंधळ घातला आणि त्यांची संधी हुकली. मॅच प्रेझेन्टेशनमध्ये तुला सध्या काय हव आहे? असे विचारल्यानंतर, उद्विग्न झालेला हॅन्सी म्हणालेला, “तो एक रन.”
हॅन्सी दक्षिण आफ्रिका क्रिकेटला आणखी पुढे घेऊन जाईल असे वाटत असतानाच, क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणी घटना समोर आली. दिल्ली पोलिसांनी भारत-दक्षिण आफ्रिका सिरीजनंतर मॅच फिक्सिंगच मोठं रॅकेट समोर आणलं. त्याच नाव आलं हॅन्सी क्रोनिएच. सुरुवातीला नाना म्हणणारा हॅन्सी, चार दिवसातच फिक्सिंग केल्याचं म्हणत कबूल झाला. त्याच्यासोबत त्याचे संघ सहकारी आणि भारताचा कॅप्टन मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यासह बरीच नाव समोर आली. बॅन-लाईफ बॅनच सत्र सुरू झालं. शेवटी पूर्ण चौकशी व्हायच्या आधीच लाईफ बॅन लागलेल्या हॅन्सीने प्रामाणिकपणा दाखवत रिटायरमेंटची घोषणा करून टाकली. केवळ दक्षिण आफ्रिकाच नव्हेतर, जगभरातील समस्त युवा क्रिकेटर्सचा आयडल असणारा हॅन्सी विलन ठरला होता. या संपूर्ण प्रकरणात अनेक मोठी नावे आहेत, अशी चर्चा होती. मात्र, हॅन्सी-अझरसारखे क्रिकेटर्स आणि काही बुकी सोडून कोणावर जास्त कारवाई झालीच नाही.
ऐन उमेदीच्या काळात क्रिकेट सुटल्यावर हॅन्सी शांत बसला नाही. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या नेल्सन मंडेला यांनी देखील त्याच्या पाठीवर ठेवला. तू पुन्हा देशासाठी हिरो बनू शकतो असा कॉन्फिडन्स दिला. हॅन्सी ‘बेल इक्विपमेंट’ नावाच्या कंपनीत काम करू लागला. लवकरच एक बिझनेसमन म्हणून देखील तो आपली ओळख बनवू लागला. त्यानिमित्ताने त्यांना सातत्याने प्रवास करावा लागायचा. असंच ३१ मे २००२ रोजी तो, बेल इक्विपमेंटमधील मिटिंग संपवून, जोहान्सबर्ग येथून जॉर्ज येथील आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. जाण्याचे इतर मार्ग उपलब्ध नसल्याने त्याने ‘हॉकर सिडली एचएस ७४८ टर्बो प्रोप’ हे एअर क्वेरियसच चार्टर प्लेन भाड्याने घेतलं. विमानात तो एकटाच प्रवासी आणि दोन पायलट. जोहान्सबर्ग येथून उड्डाण घेतलेले हे विमान. जॉर्ज शहराच्या हद्दीत पोहोचल. मात्र, विमानतळापर्यंत नाही. जॉर्जच्या डोंगरात घिरट्या घालत घालत विमान कोसळलं. क्रोनिएसह दोन्ही पायलटचा जागीच मृत्यू झाला.
त्याचा हा मृत्यू मागे अनेक शंका-कुशंका सोडून गेला. खरंच हा अपघात होता की घातपात? हा त्यातील सर्वात मोठा प्रश्न. कारण, मॅच फिक्सिंग प्रकरण अद्याप शमले नव्हते. त्यासंदर्भात कोणी हा अपघात घडवून आणला का याविषयी चर्चा सुरू झाली, आणि तितक्याच लवकर थांबलीही. पुढे, २००७ वर्ल्डकप वेळी पाकिस्तानचे कोच असलेल्या बॉब वूल्मर यांचादेखील खून झाला. मॅच फिक्सिंग प्रकरणावेळी तेच दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे कोच होते. त्या हत्येनंतर पुन्हा एकदा क्रोनिएच्या मृत्यूची चर्चा झाली. मात्र, त्याचा हा मृत्यू आजपर्यंतही एक कोडे म्हणूनच राहिला.
हॅन्सीचा अकाली मृत्यू सर्वांना चटका लावून गेला. मात्र, हॅन्सीला अशा मृत्यूची कदाचित आधीच कल्पना होती. त्याचा मोठा भाऊ फ्रांस याने एका मुलाखतीत सांगितले होते की, “हॅन्सीने त्याच्या मृत्यूच्या एक दशकपूर्वी मला म्हटले होते की, आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी सलग प्रवास करत असतो. कधी बसने, तर कधी विमानाने. मला वाटते की, माझा मृत्यू एका विमान अपघातात होईल आणि मी स्वर्गात जाईल.” जे क्रिकेट तुम्हाला यशाच्या शिखरावर नेते, त्या क्रिकेटशी गद्दारी केल्यास, ते क्रिकेटच तुम्हाला पुन्हा एकदा जमिनीवर आणते. हे क्रोनिएच्या उदाहरणावरून यथायोग्य समजून जाते.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
IPL 2023मध्ये ‘हे’ ३ बदल करत सीएसके करणार दमदार पुनरागमन, दुसरा बदल खूपच महत्त्वाचा
‘या’ ५ गोष्टी घडल्यामुळे पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सने जिंकली IPL 2022ची ट्रॉफी
प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढत असा मिळवला हार्दिकच्या गुजरात टायटन्सने IPL 2022चा मुकूट