---Advertisement---

असा कर्णधार होणे नाही!!!

On: बुधवार, एप्रिल 13, 2022 8:51 AM
---Advertisement---

स्पेनमध्ये कॅप्टन म्हटलं की एकच माणूस समोर येतो. किती आले आणि किती गेले, पण सगळ्यांच्या मनात घर करून राहिलेला कॅप्टन तोच. भारतात जस कॅप्टन म्हटलं की सौरव गांगुली डोळ्यासमोर येतो तसंच काहीसं इथे आहे. हा कॅप्टन आहे, कार्लोस पुयोल.

आपल्या कारकिर्दीची सुरुवात आधी गोलकीपर आणि नंतर दुखापतीमुळे आक्रमक फळीतील खेळाडू म्हणून करणाऱ्या पुयोलने १९९५ साली बार्सिलोनाच्या ला-मासिया या क्लबकडून खेळण्यास सुरुवात केली. तेव्हा पुन्हा एकदा त्याला त्याची जागा बदलून बचावफळीतील खेळाडू म्हणून खेळावे लागले.

त्यानंतर १९९९ साली त्याने बार्सिलोनातर्फे पहिला सामना खेळला. पुढच्या वर्षी २००० साली त्याला स्पेनकडून पहिला सामना खेळायची संधी मिळाली. त्याने मिळालेल्या प्रत्येक संधीत स्वतःला सिद्ध करत संघात आपले स्थान पक्के केले. २००२ साली त्याला युरोपचा सर्वोत्तम राईट बॅक हा पुरस्कार मिळाला. २००३ साली लुईस इनरिकच्या निवृत्ती नंतर पुयोलला बार्सिलोनाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले.

बार्सिलोनासाठी सर्व स्पर्धांमध्ये पुयोल ने ५९३ सामने खेळले. त्यात त्याला ६ वेळा ला लिगा तर ३ वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद संघाला मिळवून देण्यात यश आले. २००९ साली बार्सिलोनाने पुयोलच्या नेतृत्वाखाली तब्बल ६ स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आणि एक विक्रम केला. २०१४ साली कराराचे २ वर्ष बाकी असतानासुद्धा पुयोलने हा त्याचा अंतिम हंगाम असेल असे घोषित केले. १५ वर्ष बार्सिलोना संघाकडून खेळताना १० वर्ष संघाचा कर्णधार म्हणून त्याने संघासाठी योगदान दिले.

स्पेनचेही त्याने १०० सामन्यात प्रतिनिधित्व केले. स्पेनने २००८ साली युरो कप आणि २०१० साली फिफा विश्वचषक स्पर्धा जिंकली त्या दोन्ही स्पर्धांमध्ये पुयोलने जवळपास सर्व सामने खेळले होते. २०१० च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत गोल करणारा पुयोल एकमेव खेळाडू होता. त्याच्या गोलच्या मदतीनेच स्पेनने बलाढ्य जर्मनीचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. २०१२ चा युरो कप दुखापतीमुळे मुकल्याने पुयोलने २०१३ साली स्पेन साठी आपला १०० वा आणि अखेरचा सामना खेळला.

तो नेहमीच खूप मेहनत घेणारा खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. संघाचा सराव झाल्यानंतर सुद्धा तो एकटा सराव करत असे तसेच संघाला जरी सरावापासून सुट्टी असली तरी पुयोल त्यादिवशी सुद्धा सराव करताना मैदानात दिसायचा.

तो त्याच्या खेळाबरोबरच कर्णधार म्हणून सुद्धा खूप प्रसिद्ध होता. कोणत्याही सामन्याच्या शेवटच्या सेकांदापर्यंत प्रत्येक खेळाडूने आपले संपूर्ण लक्ष खेळावरच दिले पाहिजे. संघ ३-४ गोलच्या फरकाने जिंकत असला तरी सुद्धा तो शेवटच्या मिनिटाला खेळाडूंना ओरडत असे. मैदानावर वाद होऊ न देता खेळावर जास्त लक्ष द्यायचा त्याचा प्रयत्न असायचा.

एकदा उपांत्य फेरीत रिअल मद्रिदच्या समर्थकांनी पिकेवर लायटर फेकून मारले आणि पिके ते घेऊन सामन्यातील पंचांना दाखवायला घेऊन जात असतानाच पुयोलने त्याला अडवले आणि आपल्या जागेवर जाऊन खेळावर लक्ष द्यायला सांगितले यावरूनच पुयोलचे खेळाविषयी प्रेम आणि संघाचे नेतृत्व करायची क्षमता दिसून येते. त्याने नेहमीच वादापेक्षा खेळावर जास्त लक्ष दिले आणि संघातील खेळाडूंना सुद्धा तसेच करण्यास सांगितले.

त्याच्या या खिलाडू वृत्तीमुळेच नेहमी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू त्याच्याकडे आदराने बघत आणि त्याच्या संघातील खेळाडूंना नेहमी त्यामुळेच एक आदरयुक्त भीती असायची. साल २०१९ ला पुयोलला बार्सिलोनाने स्पोर्टिंग डायरेक्टरचे पद देण्याची तयारी दाखवली होती पण पुयोलने पद स्विकारण्यास नकार दिला.

आज सुद्धा स्पेन किंवा बार्सिलोनाचा सर्वोत्तम कर्णधार असा कुठे उल्लेख झाला तर लोकांच्या डोळ्यासमोर पुयोलचा चेहरा येतो आणि हेच तो किती महान खेळाडू आणि कर्णधार होता याचे उदाहरण आहे. अशा या आदर्श कर्णधाराचा आज(१३ एप्रिल) वाढदिवस म्हणून या शब्दरूपी शुभेच्छा.

महत्त्वाच्या बातम्या – 

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दंडावर काळी पट्टी बांधून का खेळले बेंगलोर संघाचे खेळाडू? घ्या जाणून

क्रिस्टियानो रोनाल्डोला राग अनावर, चाहत्याचा मोबाईल फोडल्याचा व्हिडिओ व्हायरल

आनंदाची बातमी! केरला ब्लास्टर्सला नमवत हैदराबादचा दणक्यात विजय; आयएसएल विजेतेपदावर कोरले नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---