इशांतला ट्रोल केलं नाही, असा माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. अनेकांनी त्याला कित्येकदा ट्रोल केलंय. इतकी वर्षे होऊनही आजसुद्धा हा का खेळतोय? निवृत्त का होत नाही? असं अनेकजण विचारतात. पण त्यात इशांतचा काहीच दोष नाही. तो फक्त 35च वर्षांचा आहे. इशांत शनिवारी (दि. 2 सप्टेंबर) आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्याविषयी काही खास गोष्टी…
इतकी वर्षे सतत टीकेचा धनी झालेला इशांत शर्मा (Ishant Sharma) या सगळ्याला पुरून उरलाय. नोव्हेंबर, 2021मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळणारा इशांत भारतीय वेगवान गोलंदाजीचा सीनिअर म्हणून भूमिका निभावताना दिसला होता. कितीही काही म्हटलं तरी इतक्या अनुभवाचा कुठे ना कुठे फायदा झालाच. पंटरला त्याने कसा त्रास दिला होता सगळ्यांनाच आठवत असेल. 2014मधला लॉर्ड्सवरचा स्पेलही आठवत असेल. मात्र, याबरोबरच एका ओव्हरमध्ये दिलेल्या 30 रन्स आणि अशा अनेक ओव्हर्ससुद्धा कुणी विसरू शकत नाही.
आपण कसोटीच खेळत राहिलेलं बरं हे समजायला इशांतला थोडा उशीर झाला. गेली तीन- चार वर्षे त्याने ते मनावर घेतलंय आणि त्याचा आनंदही घेतोय. फिटनेसवर सुद्धा भरपूर लक्ष दिलंय. जानेवारी 2017 पासून त्याने 32 कसोटी सामन्यात 99 विकेट्स घेतल्यात. हे आकडे शमी आणि अश्विनच्या आकड्यांपेक्षा कमी असले तरी पूरक आहेत. इशांतने त्याची भूमिका योग्य निभावली हे कुणी नाकारू शकत नाही.
हल्ली तो बॅटिंगसुद्धा बरी करू लागलाय. मागच्यावर्षी जडेजाबरोबर खेळताना त्याने तब्बल 63 चेंडू खेळून काढले होते. इशांत दुसऱ्या बाजूला आहे म्हणून जडेजा स्ट्राईक रोटेट करायला अजिबात कचरत नव्हता. त्यावेळी वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तर त्याने अर्धशतक मारलं. त्यावेळी त्याच्यापेक्षा कोहलीला जास्त आनंद झाला. याच इशांतने लक्ष्मणबरोबर चांगली भागीदारी करत एकदा भारताला विजय मिळवून दिला होता.
कोहली कसोटीचा खेळाडू नाही, त्याला संघात का घेतलंय अशी चौफेर टीका सुरू होती. भारत तेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. ऍडलेड कसोटीतले कोहलीचे पहिले शतक अनेकांना आठवत असेल. या शतकाच्या वेळी दुसऱ्या बाजूला त्याची साथ द्यायला इशांतच उभा होता.
इशांतचे भारतीय क्रिकेटमधलं योगदान भरीव नसलं, तरी दुर्लक्ष करण्याजोगं निश्चितच नाहीये. आजही अनेकजण त्याचा वाढदिवस विसरूनच गेलेत. इशांतला मात्र त्याचा फरक पडत नसेल.
Happy birthday Ishant Sharma!
What a great early birthday present this was 🔥 pic.twitter.com/WEnyK1gofn
— ICC (@ICC) September 2, 2019
इशांत शर्माबद्दल काही मजेशीर आकडेवारी
1. भारताकडून ज्या ज्या खेळाडूंनी 92 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत, त्यांपैकी 100 पेक्षा कमी वनडे सामने खेळणारा इशांत हा व्हीव्हीएस लक्ष्मणनंतरचा केवळ दुसरा क्रिकेटर आहे.
2. 2007 सालापूर्वी भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या आणि 2020मध्ये भारतीय संघाकडून एकतरी सामना खेळलेल्या 2 खेळाडूंमध्ये इशांतचा समावेश होतो. त्यातील एक खेळाडू रोहित शर्मा हा खेळाडू आहेत.
3. भारताकडून कसोटीत कमीतकमी 200 विकेट्स घेतलेल्या गोलंदाजांमध्ये केवळ इशांत शर्मा, झहीर खान आणि जवागल श्रीनाथ याच खेळाडूंनी मायदेशातील विकेट्सपेक्षा परदेशात जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
4. भारताकडून कसोटीत केवळ 2 वेगवान गोलंदाजांनी 200पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यात इशांत 311 विकेट्ससह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. अन्य गोलंदाजांमध्ये कपिल देव (434), झहीर खान (311) विकेट्स घेतल्या आहेत.
5. भारताकडून केवळ 13 खेळाडूंना 100 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यात अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग हेच केवळ पूर्णवेळ गोलंदाज आहेत. यात इशांतचाही समावेश आहे. तो भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा एकूण 11 वा, तर गोलंदाजांमध्ये तिसराच खेळाडू आहे. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनीही 2023मध्ये 100 कसोटी खेळण्याचा पराक्रम केला. त्यामुळे आता 100 कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एकूण 13 भारतीयांचा समावेश झाला आहे. आर अश्विन (94) हा येत्या काही काळात 100 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम पूर्ण करेल.
इशांत शर्माची कारकिर्द-
कसोटी सामने- 104, विकेट्स- 311, सरासरी- 32.23
वनडे सामने- 80, विकेट्स- 115, सरासरी- 30.97
टी20 सामने- 14, विकेट्स- 08, सरासरी- 50.00
हेही वाचा-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 15: लांब केसांमुळे अक्षरश: दंड भरायला तयार होणारा इशांत शर्मा
‘लंबू’ने ताशी 152.2च्या गतीने फेकलेला कारकीर्दीतील वेगवान चेंडू, वाचा इशांतबद्दल माहीत नसलेल्या 10 गोष्टी
मराठीत माहिती- क्रिकेटर इशांत शर्मा