-आदित्य गुंड
इशांतला ट्रोल केलं नाही असा माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. अगदी मी स्वतः त्याला कित्येकदा ट्रोल केलंय.इतकी वर्षे होऊनही आजसुद्धा हा का खेळतोय? निवृत्त का होत नाही? असं अनेकजण विचारतात. पण त्यात इशांतचा काहीच दोष नाही. तो फक्त ३० च वर्षांचा आहे. त्याच्यात किमान काही वर्षांचं क्रिकेट नक्की बाकी आहे असं मला वाटतं.
इतकी वर्षे सतत टीकेचा धनी झालेला इशांत ह्या सगळ्याला पुरून उरलाय. आजघडीला भारतीय वेगवान गोलंदाजीचा सिनियर म्हणून तो भूमिका निभावतोय. कितीही काही म्हटलं तरी इतक्या अनुभवाचा कुठे ना कुठे फायदा होतोच. बुमराह, शमी सारखे नवे गोलंदाज, “तुमसे ना हो पायेगा.” म्हणत त्याची खिल्लीसुद्धा उडवतात. ही अशी चेष्टा स्वीकारायला सुद्धा मोठं मन लागतं. इशांत हा मनाचा मोठेपणा दाखवतो.
पंटरला त्याने कसा त्रास दिला होता सगळ्यांनाच आठवत असेल. २०१४ मधला लॉर्ड्सवरचा स्पेलही आठवत असेल. मात्र याबरोबरच एका ओव्हरमध्ये दिलेल्या ३० रन्स आणि अशा अनेक ओव्हर्ससुद्धा कुणी विसरू शकत नाही. अर्थात यानंतरही तो अजून खेळतोय ह्यात त्याच कौतुक आहे.
आपण कसोटीच खेळत राहिलेलं बरं हे समजायला इशांतला थोडा उशीर झाला.गेली तीन चार वर्षे त्याने ते मनावर घेतलंय आणि त्याचा आनंदही घेतोय.फिटनेसवर सुद्धा भरपूर लक्ष दिलंय. जानेवारी २०१७ पासून त्याने २४ कसोटी सामन्यात ८५ विकेट्स घेतल्यात. हे आकडे शमी आणि अश्विनच्या आकड्यांपेक्षा कमी असले तरी पूरक आहेत. इशांतने त्याची भूमिका योग्य निभावली हे कुणी नाकारू शकत नाही.
हल्ली तो बॅटिंगसुद्धा बरी करू लागलाय. मागच्यावर्षी जडेजाबरोबर खेळताना त्याने तब्बल ६३ चेंडू खेळून काढले होते. इशांत दुसऱ्या बाजूला आहे म्हणून जडेजा स्ट्राईक रोटेट करायला अजिबात कचरत नव्हता. त्यावेळी वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तर त्याने अर्धशतक मारलं. त्यावेळी त्याच्यापेक्षा कोहलीला जास्त आनंद झाला. ह्याच इशांतने लक्ष्मणबरोबर चांगली भागीदारी करत एकदा भारताला विजय मिळवून दिला होता.
कोहली कसोटीचा खेळाडू नाही, त्याला संघात का घेतलंय अशी चौफेर टीका सुरू होती. भारत तेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. ऍडलेड कसोटीतले कोहलीचे पहिले शतक अनेकांना आठवत असेल. ह्या शतकाच्या वेळी दुसऱ्या बाजूला त्याची साथ द्यायला इशांतच उभा होता.
इशांतचे भारतीय क्रिकेटमधलं योगदान भरीव नसलं तरी दुर्लक्ष करण्याजोगं निश्चितच नाहीये. आजही अनेरजण त्याचा वाढदिवस विसरूनच गेलेत. इशांतला मात्र त्याचा फरक पडत नसेल.
Happy birthday Ishant Sharma!
What a great early birthday present this was 🔥 pic.twitter.com/WEnyK1gofn
— ICC (@ICC) September 2, 2019
इशांत शर्माबद्दल काही मजेशीर आकडेवारी- (संंकलन- शरद बोदगे)
१. भारताकडून ज्या ज्या खेळाडूंनी ९२ किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत त्यांपैकी १०० पेक्षा कमी वनडे सामने खेळणारा इशांत हा व्हीव्हीएस लक्ष्मणनंतरचा केवळ दुसरा क्रिकेटर आहे.
२. २००७ सालापुर्वी भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या आणि २०२०मध्ये भारतीय संघाकडून एकतरी सामना खेळलेल्या २ खेळाडूंमध्ये इशांतचा समावेश होतो. त्यातील एक खेळाडू रोहित शर्मा हा खेळाडू आहेत.
३. भारताकडून कसोटीत कमीतकमी २०० विकेट्स घेतलेल्या गोलंदाजांमध्ये केवळ इशांत शर्मा, झहीर खान आणि जवागल श्रीनाथ याच खेळाडूंनी मायदेशातील विकेट्सपेक्षा परदेशात जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
४.भारताकडून कसोटीत केवळ चार वेगवान गोलंदाजांनी २००पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यात इशांत २९७ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. अन्य गोलंदाजांमध्ये कपिल देव (४३४), झहीर खान (३११) आणि जवागल श्रीनाथ (२३६) यांचा समावेश होतो.
५.भारताकडून केवळ १० खेळाडूंना १०० कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यात अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग हेच केवळ पुर्णवेळ गोलंदाज आहेत. सध्या इशांत ९७वा कसोटी सामना खेळला आहे. त्याने येत्या काळात आणखी ३ कसोटी सामने खेळले तर तो भारताकडून १०० कसोटी सामने खेळणारा एकूण ११वा तर गोलंदाजांमध्ये तिसराच खेळाडू ठरणार आहे. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली (८६), चेतेश्वर पुजारा (७७) आणि आर अश्विन (७१) यांना पुढील ३-४ वर्षात १०० कसोटी सामने खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे इशांत जर १०० कसोटी सामने खेळणारा खेळाडू ठरला तर पुढे अशी कामगिरी करणारा १२वा खेळाडू पहाण्यासाठी भारतीय क्रिकेटप्रेमींना बरीच वर्ष वाट पहावी लागणार आहे.
इशांत शर्माची कारकिर्द-
कसोटी सामने- ९७, विकेट्स- २९७, सरासरी- ३२.३९
वनडे सामने- ८०, विकेट्स- ११५, सरासरी- ३०.९७
टी२० सामने- १४, विकेट्स- ०८, सरासरी- ५०.००