भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा आज (१५ नोव्हेंबर) वाढदिवस. सानिया आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. सानियाने बऱ्याच टेनिस स्पर्धेत विजेतीपदं जिंकून भारताचे नाव जगात मोठे केले आहे. अनेक विजेतेपदे जिंकण्यासोबतच ती दुहेरी क्रमवारीतही पहिल्या क्रमांकावर आहे. जर आपण तिच्या टेनिस कारकिर्दीवर नजर टाकली तर, हे सहज लक्षात येते की, देशातील या स्टार टेनिसपटूने आपल्या दमदार कामगिरीमुळे बरीच प्रशंसा मिळवली आहे. टेनिस कोर्टवर मार्टिना हिंगीससह जगातील अनेक अव्वल खेळाडूंना हरवणाऱ्या सानियाच्या कारकिर्दीत एक वेळ अशी आली होती, जेव्हा ती अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपला सामना खेळण्यासाठी टेनिस कोर्टवर पोहोचली होती.
ही घटना १९९९ सालची आहे. त्यावर्षी, ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने जकार्ता (इंडोनेशिया) येथे होणार्या १४ वर्षांखालील जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी तीन अव्वल भारतीय खेळाडूंना पाठवण्याची घोषणा केली होती. इतर खेळाडूंप्रमाणे सानियालाही या स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. मात्र जकार्ता येथे होणाऱ्या चॅम्पियनशिपमध्ये समावेश होण्यासाठी गुवाहाटीत होणाऱ्या स्पर्धेत किमान उपांत्य फेरी गाठणे आवश्यक होते.
सानिया मिर्झा तिचे वडील इम्रान मिर्झा यांच्यासोबत, गुवाहाटी येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हैदराबादहून कोलकातासाठी रवाना झाली. कोलकाता येथे पोहोचल्यानंतर त्यांना पुन्हा विमानाने गुवाहाटी गाठायचे होते. त्यामुळे सानिया आणि तिचे वडील पाच दिवसआधीच स्पर्धेसाठी निघाले होते. त्यांना घरातून बाहेर पडल्यानंतर अनेक समस्या येऊ लागल्या. ज्या ट्रेनने त्यांना कोलकात्याला पोहोचायचे होते ती ट्रेन आधीच १२ तास उशीरा आली होती.
जेव्हा ती वडिलांसोबत खरगपूरला पोहोचली, तेव्हा ट्रेन थांबवण्यात आली आणि आता ही ट्रेन पुढे जाणार नाही असं सांगण्यात आलं. खरगपूर ते कोलकाता हे अंतर १०० किलोमीटर होते. पश्चिम बंगालमध्ये दंगल उसळल्याने ट्रेन थांबवण्यात आली होती.
पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या दिवशी बातमी आली की ‘बंद’ एक दिवस वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सानिया आणि तिच्या वडिलांच्या चिंतेत वाढ झाली होती. यादरम्यान तिचे वडील रेल्वे स्थानकाबाहेर गेले आणि एका टॅक्सी चालकासह परत आले. हा टॅक्सी चालक सानिया आणि तिच्या वडिलांना कोलकाता येथे घेऊन जाणार होता. सानियाचे वडील टॅक्सीमध्ये सामान चढवत असताना त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. अशा परिस्थितीत कोलकात्याला जाणे गरजेचे नव्हते तर डॉक्टर शोधणे गरजेचे होते. दवाखाना शोधून सोनियाच्या वडिलांवर उपचार करण्यात आले, आणि त्यानंतर त्यांनी कोलकाता गाठले.
कोलकात्याला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी गुवाहाटीला जाणारे विमान पकडले. त्यानंतर पाच दिवसांची स्पर्धा संपल्यानंतर सानिया आणि तिचे वडील परतीच्या मार्गावर होते. गुवाहाटी विमानतळावर पोहोचताच बॉम्बस्फोटाच्या अफवेमुळे विमानाला १२ तास उशीर झाला. त्यानंतर त्यांनी कोलकाता गाठले. तेथून हैदराबादला जाण्यासाठी गाडी पकडली.
जेव्हा सानिया आणि तिचे वडील कोलकाताहून हैदराबादला निघाले तेव्हा तिचे वडील इम्रान मिर्झा वर्तमानपत्र वाचत होते. यादरम्यान सानियाची नजर त्या वृत्तपत्रातील एका बातमीवर पडली. ज्यामध्ये ज्युनियर राष्ट्रीय संघाची घोषणा करण्यात आली होती. या संघात सानिया मिर्झाच्या नावाचाही समावेश करण्यात आला होता. मग काय तिने आनंदाने उडी मारली. कारण तिला इंडोनेशियामध्ये होणाऱ्या चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधी मिळणार होती. सानियाने आपल्या आत्मचरित्रात ‘येस अगेन्स्ट ऑड्स’ या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात फ्लॉप झालेल्या कोहलीने फिंचकडून शिकाव्यात ‘या’ गोष्टी, ज्याचा भारताला होईल फायदा!
T20 WC Final: मोठ्या सामन्यात माती खाणाऱ्या न्यूझीलंड संघावर मिम्सचा वर्षाव, भन्नाट विनोदही बनले
चँपियन ऑस्ट्रेलियाला चाहत्यांकडून ‘गार्ड ऑफ हॉनर’, बँड बाजाच्या आवाजाने चढवली रंगत; व्हिडिओ व्हायरल