भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग आज आपला 42वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अनेक लोक या दिग्गज खेळाडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. भारताच्या या अष्टपैलूचे विश्वचषकातील योगदान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. आकडेदेखील युवराजचे विश्वचषकातील योगदान स्पष्ट करतात.
2007 टी20 विश्वचषक-
सन 2007 मध्ये टी20 विश्वचषकातील इंग्लंड विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकातील 6 चेंडूंवर सलग ६ षटकार मारले होते. या सामन्यात त्याने केवळ 12 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. आतंरराष्ट्रीय क्रिकेट मधील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य सामन्यात युवराजने केवळ 30 चेंडूत 70 धावांची आक्रमक खेळी केली होती. अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. विशेष म्हणजे भारताने पहिल्यांदाच होत असलेल्या टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरण्यात युवराजने मोलाची भूमिका बजावली होती.
2011 वनडे विश्वचषक-
सन 2011 मध्ये झालेल्या वनडे विश्वचषकात युवराज सिंगला मालिकावीर घोषित करण्यात आले होते. युवराजने या विश्वचषकातील 9 सामन्यांत 4 अर्धशतके व 1 शतकासह 362 धावा केल्या होत्या. तसेच त्याने गोलंदाजीत 15 विकेट्सदेखील घेतल्या होत्या. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षानंतर वनडे विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकात युवराजला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले होते.
वनडे विश्वचषकादरम्यानच युवराजला कर्करोगाची लक्षणे दिसून येत होती. काही महिन्यांतच तो उपचारासाठी विदेशात रवाना झाला. आणि अवघ्या एक वर्षातच या जिगरबाज खेळाडूने भारतीय संघात पुनरागमन केले होते.
युवराजची आतंरराष्ट्रीय कारकीर्द-
युवराजने आपल्या आतंरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये 40 कसोटी, 304 वनडे व 58 टी20 सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 33 पेक्षा अधिक सरासरीने युवराजने 1900 धावा केल्या आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये 36 पेक्षा अधिक सरासरीने 8701 धावा व टी20 क्रिकेट मध्ये जवळपास 28 च्या सरासरीने 1177 धावा केल्या आहेत. युवराजने गोलंदाजीत देखील उत्तम कामगिरी केलेली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 9, तर वनडे क्रिकेट मध्ये 111 विकेट मिळवल्या आहेत. टी20 मध्ये देखील युवराजने 28 बळी मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३: दादा गुडनाईट बोलून निघून गेला, परंतु युवराज मात्र पूरता घाबरला
हॅपी बर्थडे युवी: युवराज सिंगच्या एखाद्या युवराजासारखा झालेल्या कारकिर्दीचा लेखाजोखा!