वेलिंगटन। रविवारी(3 फेब्रुवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्धचा पाचवा वनडे सामना 35 धावांनी जिंकत पाच सामन्यांची वनडे मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या चार विकेट्स 18 धावांवर गमावल्यानंतर रायडू (90), विजय शंकर(45), हार्दिक पंड्या(45) आणि केदार जाधव(34) यांनी केलेल्या धावांच्या जोरावर 252 धावांचा टप्पा गाठला.
पंड्याने अखेरच्या काही षटकात फलंदाजीला येत तुफानी फटकेबाजी केली होती. त्याने 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 22 चेंडूत 45 धावांची खेळी केली. तसेच त्याने या सामन्यात गोलंदाजी करताना न्यूझीलंडच्या रॉस टेलर आणि मिशेल सँटेनर या फलंदाजांना बादही केले.
त्याची ही अष्टपैलू कामगिरी पाहून भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने त्याचे कौतुक केले आहे. 30 मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट असल्याचे हरभजनने म्हटले आहे.
इंडिया टूडेशी बोलताना हरभजन म्हणाला, ‘हार्दिकने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. त्याचा फॉर्म पाहून मला आनंद वाटत आहे. त्याने सर्व वाद मागे टाकत चांगली कामगिरी केली आहे.’
‘पंड्या खरचं चांगली कामगिरी करत आहे आणि तो भारतीय संघातील खूप महत्त्वाचा सदस्य आहे. मी त्याच्यासाठी आनंदी आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजी असे दोन्हीतही चांगली कामगिरी करत असल्याने भारतीय संघासाठी ही चांगली गोष्ट आहे.’
हार्दिकवर मागील महिन्यात कॉफी विथ करन शोमध्ये केलेल्या महिलांबद्दलच्या विवादात्मक विधानांमुळे काही दिवस बंदी घालण्यात आली होती. पण ही बंदी उठवल्यानंतर त्याची न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली.
मात्र या प्रकरणामुळे हार्दिकवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. यात हरभजनने ही हार्दिकवर कडाडून टीका केली होती. पण हार्दिकने वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली.
त्याचबरोबर हरभजनने भारतीय संघाचेही कौतुक केले आहे. तो म्हणाला, ‘भारतीय संघ सध्या जगातील सर्वोत्तम संघ आहे, यात शंका नाही.’
‘आपण विचार केला होता की न्यूझीलंडशी खेळताना थोडे कठीण जाईल पण भारतीय संघाने आपण किती मजबूत आहोत हे दाखवून दिले.’
तसेच पुढे हरभजन म्हणाला, भारतीय संघ ज्याप्रकारे पुढे जात आहे ते पाहणे आनंददायी आहे. तसेच यासाठी त्याने भारताचा कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाला श्रेय दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–कोहली फॅन्सच टेन्शन वाढलं, रोहित विराटचा सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी सज्ज
–२०१९च्या विश्वचषकात हा खेळाडू असणार रोहित-धवनला पर्याय
–१२०४ फलंदाजांनी ज्याचा विचारही केला नसेल तो विक्रम करण्यासाठी रोहित सज्ज
–टीम इंडिया विरुद्धच्या टी२० मालिकेला न्यूझीलंडचा हा स्पोटक खेळाडू मुकणार, जाणून घ्या कारण