विश्वचषक सुरू होण्यासाठी आता अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या विश्वचषकाला 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने सुरुवात होईल. तत्पूर्वी, भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू व समालोचक हरभजन सिंग याने तब्बल 8 प्रेडिक्शन करत आपले अंदाज वर्तविले आहेत. यामध्ये त्याने भारतीय खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील असे म्हणले.
विश्वचषकासाठी सध्या अनेक समीक्षक आपापले अंदाज वर्तवत आहेत. त्यावेळी प्रसारण वाहिनीशी बोलताना हरभजन याने आपले अंदाज व्यक्त केले. या स्पर्धेत भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा सर्वाधिक धावा करेल असे त्याने म्हटले. तर, भारताचाच प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव हा सर्वाधिक बळी घेईल असे तो म्हणाला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा सर्वाधिक षटकार मारेल असे त्याने म्हटले. तर, युवा सलामीवीर शुबमन गिल हा स्पर्धेचा मानकरी ठरू शकतो अशी भविष्यवाणी त्याने केली. तसेच पहिला विश्वचषक खेळत असलेल्या गिललाच सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार देखील मिळेल असे त्याने म्हटले
यासोबतच अफगाणिस्तानचा संघ या स्पर्धेत सर्वांना चकित करणारी कामगिरी करेल असे त्याने म्हटले. हरभजन याने आपले चार उपांत्य फेरीतील संघ सांगताना केवळ तीनच संघांचा उल्लेख केला. यामध्ये यजमान भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. चौथ्या संघाबद्दल त्याने कोणतेही वक्तव्य केले नाही. तर, भारत या विश्वचषकाचा विजेता राहिल असे त्याने म्हटले.
(Harbhajan Singh 8 Prediction Ahead 2023 ODI World Cup)
हेही वाचा-
‘भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानी खेळाडू घाबरतात…’, PAK दिग्गजाचे त्याच्याच देशाबद्दल खळबळजनक विधान
‘या’ दोघांना विश्वचषकात संधी मिळणं खूपच कठीण, सेहवागने नावासहित कारणही टाकलं सांगून