भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने निवड समितीने राष्ट्रीय संघाची निवड करताना कोणते मापदंड वापरते हे कळत नसल्याचे म्हटले आहे.
4 आॅक्टोबर पासून सुरु होणाऱ्या विंडिज विरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी एमएसके प्रसाद अध्यक्ष असलेल्या निवड समितीने दोन दिवसापूर्वी 15 जणांचा भारतीय संघ जाहिर केला आहे.
या संघात अनेक धक्कादायक बदल करण्यात आले आहेत. यातील आश्चर्यकारक निर्णय म्हणजे करुण नायरला संघातून वगळण्यात आले आहे. नायरला आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील एकाही सामन्यात 11 जणांच्या संघात संधी देण्यात आली नव्हती.
तसेच त्याला जूनमध्ये अफगाणिस्तान विरुद्धही झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातही भारतीय संघात समावेश असूनही 11 जणांच्या संघात संधी मिळली नव्हती. असे असतानाही त्याला विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
याबद्दल हरभजन सिंगने निवड समितीला प्रश्न विचारला आहे की ‘हे गुढ सोडवण्यातची गरज आहे. एखाद्या खेळाडूला तीन महिन्यांपासून बेंचवर बसवून ठेवल्यानंतरही त्याला संघात घेण्याइतके तो वाइट कसा होऊ शकतो.’
‘निवड समिती कसा विचार करते आणि राष्ट्रीय संघाची निवड करताना कोणते मापदंड वापरते हे समजणे मला कठीण जात आहे.’
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेणाऱ्या हरभजनने पुढे म्हटले आहे की ‘मला वाटते की वेगळ्या खेळाडूंसाठी वेगळे नियम आहेत. काहींना यशस्वी होण्यासाठी मोठी संधी दिली जाते तर काहींना अयशस्वी होण्यासाठीही संधी मिळत नाही. हे योग्य नाही.’
तसेच पुढे हरभजन म्हणाला की ‘जर हनुमा विहारी विंडिज विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात अपयशी ठरला तर काय? मी कोणत्याही खेळाडूबरोबर असे व्हावे असे इच्छित नाही. मी विहारीला शुभेच्छा देतो.
‘(जर विहारी विंडिज विरुद्ध कसोटी मालिकेत अपयशी ठरला) तर तूम्ही परत नायरकडे जाणार पण तो आत्मविश्वासासह आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयार असेल का?’
भारताचा अनुभवी आणि सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज हरभजनने संघ व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित केला आहे. तो म्हणाला, ‘जर संघ व्यवस्थापनने नायरला पाच कसोटीत खेळवले नाही तर याचा अर्थ असा होतो की त्याने त्याच्या बाबतीत विश्वास निर्माण केला नाही.’
‘माझा प्रश्न एवढाच आहे की निवड समितीने करुण नायरला इंग्लंड दौऱ्यात संघात समावेश करण्यासाठी कर्णधाराला मनवले? जर नसेल तर मग त्यांनी संघ व्यवस्थापनाच्या मनात असलेल्या त्याच्या नावाचा गंभीरपणे विचार केला?’
नायर हा विरेंद्र सेहवाग नंतर कसोटीत त्रिशतक करणारा भारताचा दुसराच फलंदाज आहे.
पुढे हभजनने आॅस्ट्रेलिया दौऱ्याआधी संघाची निवड योग्य पद्धतीने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
विंडिजच्या भारत दौऱ्यानंतर भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
–माजी कर्णधार एमएस धोनीबरोबर घडला विलक्षण योगायोग
-५० कसोटी खेळलेला पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू करतोय पुनरागमन
-राजकोट कसोटीपुर्वी विंडीजला मोठा धक्का, तब्बल ४८ कसोटी खेळलेला खेळाडू संघाबाहेर