भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ही मालिका टीम इंडियासोबतच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचं भविष्य ठरवेल.
न्यूझीलंडविरुद्ध व्हाईटवॉश झाल्यानंतर काही अहवाल समोर आले होते, ज्यात असं म्हटलं आहे की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघानं चांगली कामगिरी केली नाही तर गंभीरकडून कसोटी संघाचं प्रशिक्षकपद काढून घेतलं जाऊ शकतं. काही अहवालांमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, गंभीर आणि संघातील वरिष्ठ सदस्यांमध्ये काही बाबतीत एकमत नव्हतं. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया दौरा गंभीरसाठी खूप महत्त्वाचा आहे. दरम्यान, माजी फिरकीपटू हरभजन सिंग गौतम गंभीरच्या समर्थनार्थ पुढे आला आहे.
जतीन सप्रूच्या यूट्यूब चॅनलवर हरभजन म्हणाला, “गौतम गंभीर जेव्हापासून प्रशिक्षक झाला तेव्हापासून तो ना फलंदाजीला आला ना गोलंदाजीलाही गेला. तो अचानक प्रशिक्षक झाला आणि निकाल खराब यायला लागले. यासाठी संपूर्ण दोष गंभीरला दिल्या जात आहे. तुमची योजना फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवण्याची होती, मात्र ती तुमच्यावरच उलटली. गंभीर नेहमी संघाच्या भल्याचा विचार करतो. त्याला एवढ्या लवकर जज करणं चुकीचं आहे. त्याला थोडा वेळ द्यायला हवा. मोठ्या संघांना चालवणं एवढं सोपं काम नसतं.”
44 वर्षीय हरभजन असेही मानतो की, ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी पाच सामन्यांची मालिका ही गंभीरच्या संयमाची आणि रागाची परीक्षा असेल कारण तो प्रशिक्षक म्हणून बाहेर बसला असल्यानं कशावरही नियंत्रण ठेवू शकत नाही.
भज्जी पुढे म्हणाला, “मोठे संघ चालवणं कठीण आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो. जर निकाल चांगले आले तर प्रत्येकजण म्हणेल, ‘बघा, गौतम संघाला विजय मिळवून देतो’. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. गंभीरला ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. त्याला रागावर नियंत्रण ठेवून संयम बाळगावा लागेल. तो सध्या रडारवर आहे. जर मालिका चांगली गेली नाही, तर त्याचे परिणाम गंभीरला भोगावे लागतील. त्यानं फक्त शांत राहावं आणि संघाने चांगली कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे.”
हेही वाचा –
ओमानच्या खेळाडूने विश्वविक्रम केला! टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच
IND vs AUS; हर्षित राणा की प्रसिद्ध कृष्णा? पहिल्या सामन्यासाठी कोणाला मिळणार संधी?
BGT; “घरच्या मैदानावर फलंदाजी करणे कठीण…” ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे मोठे वक्तव्य!






