भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका जिंकण्याची किमया करून दाखवली. या दोन्ही मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या फलंदाज चेतेश्वर पुजाराचे सर्वजण कौतुक करत आहेत. भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग हादेखील पुजाराचा चाहता बनला आहे. पुजारा कायम माझ्या कसोटी संघात असेल, असे हरभजनने म्हटले.
पुजाराने केली ऑस्ट्रेलियात दमदार कामगिरी
भारताच्या कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज असलेल्या पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोक्याच्या वेळी चांगली कामगिरी करत भारतीय संघाला पराभवापासून वाचवले. सिडनी व ब्रिस्बेन कसोटीत अत्यंत धैर्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करत त्याने अर्धशतके झळकावली. परिणामी, भारतीय संघाला सिडनी कसोटी अनिर्णित राखण्यात तर ब्रिस्बेन कसोटी जिंकण्यास मदत झाली. पुजाराला मालिकेत शतक झळकावण्यात अपयश आले असले तरी, त्याने संपूर्ण मालिकेत तीन अर्धशतके आपल्या नावे केली. पुजाराने मालिकेत ३३.८८ च्या सरासरीने २७१ धावा काढल्या. यासाठी त्याने तब्बल ९२८ चेंडूंचा सामना केला. अखेरच्या कसोटीत पुजाराच्या अंगावर १२ वेळा चेंडूचे आघात झाले होते.
हरभजनने केले कौतुक
ऑस्ट्रेलियात शानदार कामगिरी करणाऱ्या पुजाराचे हरभजन सिंगने तोंडभरुन कौतुक केले. एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हरभजन म्हणाला, “पुजाराने मागील मालिकेतही उत्तम कामगिरी बजावली होती. ब्रिस्बेन कसोटीतील त्याचे अर्धशतक खुप महत्त्वपूर्ण होते. त्याने एक टोक सांभाळून धरल्याने इतर फलंदाजांना आपला नैसर्गिक खेळ खेळता आला. तो कोणत्याही संघासाठी एक प्रमुख खेळाडू बनू शकतो. मी कायम त्याला माझ्या ‘ऑल-टाइम इलेव्हन’ मध्ये जागा देईल. त्याच्यासारखा खेळाडू संघात असल्यास इतर खेळाडू आपला स्वाभाविक खेळ खेळतात. ज्यामुळे, कोणतेही लक्ष गाठण्यास मदत होते.”
गत मालिकेत ठरला होता मालिकावीर
भारतीय संघाने २०१८-२०१९ या वर्षीही ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केलेला. भारतीय संघाचा हा ऑस्ट्रेलियातील पहिला मालिका विजय होता. या मालिकेत पुजाराने तीन शतकांसह ५२३ धावा बनविल्या होत्या. पुजाराला या मालिकेचा मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या:
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा, २ नवख्या खेळाडूंना मिळाली जागा
कार अपघातात मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डचा मृत्यू? जाणून घ्या खरं काय ते
आजच्याच दिवशी कर्टली ऍम्ब्रोज यांनी केली होती न भूतो न भविष्यती कामगिरी