भारताचा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंग याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंग याच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. २००८ साली सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्यात पाँटिंग पंचाप्रमाणे व्यवहार करत होता आणि निर्णय सांगू लागला होता, असे हरभजनने म्हटले आहे.
खरं तर, २००८साली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेली ४ सामन्यांची कसोटी मालिका अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात होती. यातील सर्वात मोठा विवाद हा ‘मंकीगेट’चा होता. त्यावेळी हरभजनने अँड्र्यू सायमंड्सला मंकी म्हटल्याचा आरोप सायमंडने केला होता. म्हणून हरभजनवर बंदी घातली होती. पण भारतीय खेळाडूंनी बीसीसीआयच्या मदतीने हरभजनच्या बंदीविरुद्ध नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अखेर ही बंदी नंतर उठवण्यात आली होती. ते प्रकरण खूप गाजलं होते.
प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांच्याशी यूट्यूब शोमध्ये बोलताना, त्या सामन्याची आठवण काढत हरभजनने सांगितले की, “तत्कालिन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पाँटिंग हा स्वत:ला पंच समजू लागला होता. तो झेल पकडल्याचा दावा करत होता आणि निर्णयही स्वत:च सांगत होता. ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंचे म्हणणे असे आहे की, मैदानावरील गोष्टी मैदानावरच सोडून द्याव्यात. पण, माझ्यात आणि सायमंडमध्ये जे काही झाले, ते तर मैदानाबाहेर गेले होते.”
हरभजन पुढे बोलताना म्हणाला की, “मी आणि सायमंड एकमेकांच्या जवळ होतो आणि फक्त सचिन तेंडुलकर आमच्याजवळ उभा होता. पण जेव्हा त्या घटनेची सुनावणी झाली, तेव्हा मॅथ्यू हेडन, ऍडम गिलख्रिस्ट, मायकल क्लार्क आणि रिकी पाँटिंग या चौघांनी म्हटले होते की, आम्ही हरभजनला सायमंडला काहीतरी म्हणताना ऐकले होते.”
“त्यावेळी मी हाच विचार करत होतो, हे तर माझ्याजवळही नव्हते. सचिन थोडा जवळ असूनही त्याला माहित नव्हते की आमच्यात काय झाले होते. फक्त मला आणि सायमंडला माहिती होते की, आमच्यात काय घडले होते. ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने मला मायकल जॅक्शन बनवून टाकले होते. जिथे-जिथे मी जाईल तिथे-तिथे माझ्यामागे कॅमरा होता,” असेही हरभजनने सांगितले.
कसोटी मालिकेतील सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात हा प्रकार घडला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने १२२ धावांनी जिंकला होता. सायमंडने या सामन्यात नाबाद १६२ धावांची खेळी केली होती. तसेच त्या सामन्यात सायमंड सामनावीर ठरला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
आख्ख्या चेन्नई सुपर किंग्जच्या चप्पल दुरूस्त करणाऱ्याला इरफानची मदत
रणजी ट्रॉफीतला ‘बॉस’च म्हणतो, ‘या’ ३…
‘विराट म्हणायचा; ‘ती’ अजूनही माझी गर्लफ्रेंड आहे, तर…