मुंबई । भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2017 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 124 धावांनी पराभूत करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा मिळवला. सामन्यानंतर सोशल मीडियात भारताच्या पराभवापेक्षा हार्दिक पंड्या दुर्दैवीपणे धावबाद झाला, याच्यावर जास्त चर्चा होत होती.
हार्दिक पंडय़ाने अवघ्या 43 चेंडूत 76 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. पंड्याची ही खेळी पाहून एकवेळ असे वाटत होते की, भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल. रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलवर पंड्या धावबाद झाला आणि सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकला.
त्यानंतर सोशल मीडियावर रवींद्र जडेजावर टीकेची झोड उडाली. नेटिझन्सनी जडेजाच्या मीम्स आणि कमेंट्स करत त्याला टोल ट्रोल करत होते. या घटनेनंतर हार्दिक पंड्याने जडेजाची माफी मागितली, असा खुलासा खुद्द हार्दिक पंड्याने हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधताना सांगितला.
पंड्या म्हणाला की, ” ही गोष्ट कोणाला माहित नसेल की मी जड्डूची विमानात माफी मागितली होती. माझ्यामुळेच माझ्या सहकारी मित्रावर असे होत आहे. मला चांगले वाटत नव्हते. मी जडेजाला ‘स्वॉरी’ म्हणालो. त्यावर जडेजानेही काही अडचण नाही सर्व काही ठीक आहे, अशी प्रतिक्रिया दिली.”
पंड्याला सप्टेंबर 2018 साली आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरून मैदानातून बाहेर घेऊन जाण्यात आले. या घटनेची आठवण सांगताना पंड्या म्हणाला की, “त्यावेळी मला असे वाटले माझी कारकीर्द समाप्त झाली. कारण यापूर्वी कुणालाच असे मैदानातून बाहेर घेऊन गेलेले मी पाहिले नाही. मला दहा मिनिट तर खूपच वेदना होत होत्या. त्या वेदना बराच वेळ सुरू होत्या.”
भारताचा हा स्टायलिश अष्टपैलू खेळाडू दुखापतीतून आता सावरला असून पुन्हा एकदा मैदानामध्ये जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. पंड्याने 2018 नंतर भारताकडून केवळ एकच कसोटी सामना खेळला आहे. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू म्हणून संघात स्थान पक्के करण्यात तो यशस्वी ठरलाय. नुकतेच हार्दिकने लॉकडाऊनमध्ये मुंबई येथे आपल्या निवासस्थानी गुपचुपपणे विवाह उरकवल्याचे वृत्त आहे. बाप होणार असल्याची आनंदाची बातमी देखील त्याने फॅन्सबरोबर शेअर केली आहे.