भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान दुबई येथे आशिया चषक 2022 मधील सुपर फोर सामना खेळला गेला. दुबई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 5 गड्यांनी पराभूत व्हावे लागले. याचबरोबर पाकिस्तानने साखळी फेरीतील पराभवाचा बदला घेतला. भारतीय संघाला या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, तो संघाच्या व चाहत्यांच्या या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही.
मागील रविवारी (28 ऑगस्ट) भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान साखळी फेरीतील पहिला सामना खेळला गेला होता. भारतीय संघाने त्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत पाकिस्तानला पाच गड्यांनी पराभूत केले होते. भारतीय संघाच्या या विजयात हार्दिक पंड्या याचा सिंहाचा वाटा राहिला होता. हार्दिकने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना आपल्या 4 षटकांत फक्त 35 रन देऊन पाकिस्तानचे तीन महत्त्वाचे मोहरे त्याने टिपलेले. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अडचणीत असताना, कमालीचा संयम दाखवत १७ चेंडूमध्ये ४ चौकार आणि एक षटकार मारत नाबाद 33 धावांची मॅचविनिंग खेळी करत त्याने भारतीय संघाला आणि समस्त भारतीयांना जल्लोषाची संधी दिली.
सुपर फोरमध्येही त्याच्याकडून सर्वांना अशीच अपेक्षा होती. मात्र, फलंदाजीला आल्यानंतर त्याने पुरती निराशा केली. मोहम्मद हसनेनच्या गोलंदाजीवर दुसरा चेंडू खेळताना तो शून्यावर बाद झाला. हार्दिकचे अपयश पुढेही कायम राहिले. गोलंदाजीला आल्यावर त्याच्या पहिल्या दोन षटकात 26 धावा लुटल्या गेल्या. त्याने आपल्या चार षटकांत 44 धावा देऊन एक बळी मिळवला. त्याच्या या निराशाजनक कामगिरीनंतर सोशल मीडियावरही त्याला ट्रोल केले जात आहे. अनेकांनी पहिल्या सामन्यातील कामगिरी ही चुकून झाली होती असे म्हटले.