भारतीय संघाने टी२० विश्वचषक सराव सामन्यात इंग्लडविरुद्ध दमदार प्रदर्शन केले. विशेषतः फलंदाजांनी चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली नाही याशिवाय तो फलंदाजीतही अपयशी ठरला. त्यामुळे संघाच्या चिंतेत भर पडली आहे. यातच भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी पंड्याची पाठराखण करत म्हटले आहे की, हार्दिकने गोलंदाजी केली नाही तरी, भारताच्या जिंकण्याच्या संधीवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. पण जर त्याने २ षटकेही गोलंदाजी केली तर विराट कोहलीच्या संघाला त्याचा फायदा मिळू शकतो. ते म्हणाले की, संघात खेळाडूंची पोकळी भरून काढण्यासाठी खेळाडू आहेत. भारतीय संघाला २४ ऑक्टोबरला पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा सामना करावा लागेल.
भारताचे माजी कर्णधार कपिल देव म्हणाले, “एक अष्टपैलू खेळाडू संघात नेहमीच बदल घडवून आणतो. हार्दिक पंड्याने गोलंदाजी न केल्याने संघाच्या संधीवर परिणाम होणार नाही. पण, विराट कोहलीकडे उपलब्ध असलेल्या पर्यायावर त्याचा परिणाम होईल. संघात अष्टपैलू असल्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अधिक मजबूत होत जाते. याशिवाय गोलंदाजीत अधिकचा पर्याय देखील उपलब्ध राहतो.”
हार्दिक पंड्याने आयपीएल २०२१ मध्ये गोलंदाजी केली नव्हती. तो फलंदाजीतही तो विशेष काही करू शकला नव्हता. पण, तो फलंदाज म्हणून टी२० विश्वचषकात खेळण्याची शक्यता आहे. त्याच्या खराब फिटनेसमुळेच संघात बदल करण्यात आला आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या जागी शार्दुल ठाकूरला १५ जणांच्या संघात स्थान देण्यात आले. वेगवान गोलंदाज शार्दुलने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी करताना २१ विकेट्स घेतल्या होत्या.
मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हार्दिकसाठी हा दुसरा टी२० विश्वचषक आहे. २०१६ मध्ये त्याला ५ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. यादरम्यान त्याने ५ विकेट्सही घेतल्या होत्या. तसेच १६ धावा केल्या होत्या. त्याच्या एकूण टी२० कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने १७० सामन्यांमध्ये ८ अर्धशतकांच्या मदतीने २७०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४२ इतका राहिला होता. याशिवाय त्याने ११० विकेट्सही घेतल्या आहेत.