---Advertisement---

फिरकीच्या जाळ्यात अडकला ऑस्ट्रेलिया; भारतासमोर १५३ धावांचे आव्हान

On: बुधवार, ऑक्टोबर 20, 2021 5:41 PM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे २३ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ आपल्या तयारीचा अखेरचा भाग म्हणून बुधवारी (२० ऑगस्ट) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या सराव सामन्यात मैदानात उतरला. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने संघाचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला. ऑस्ट्रेलियाने सर्व फलंदाजांच्या थोड्याथोड्या योगदानाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १५२ धावा बनविल्या.

पडझडीनंतर ऑस्ट्रेलियाचा कमबॅक
या सामन्यात भारतीय संघाने आपले प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली. तरीही भारतीय संघाने फिरकीने ऑस्ट्रेलियावर आक्रमण केले. रविचंद्रन आश्विन याने डेव्हिड वॉर्नर याला एक तर मिचेल मार्शला पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद करत दमदार सुरुवात करून दिली. कर्णधार फिंच याने केवळ ८ धावांचे योगदान दिले.

आघाडीचे तीन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर अनुभवी स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनीही खराब चेंडूवर मोठे फटके खेळत व संयम दाखवत चौथ्या गडयासाठी त्यांनी ५९ धावा जमविल्या. मॅक्सवेलने शानदार फॉर्म दाखवत ३७ तर, स्मिथने ५७ धावांची खेळी केली. अखेरीस अष्टपैलू मार्कस स्टोइनिस याने ४५ चेंडूंमध्ये ४१ धावांचा तडाखा देत ऑस्ट्रेलियाला ५ बाद १५२ पर्यंत मजल मारून दिली. भारतासाठी रविचंद्रन अश्विनने दोन तर रवींद्र जडेजा, राहुल चहर व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.

पहिल्या सामन्यात दोन्ही संघांनी मिळवला विजय
मुख्य स्पर्धेच्या आधी प्रत्येक संघ दोन सराव सामने खेळत आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा तर भारताने इंग्लंडचा पराभव केला होता. या सामन्यात विजय मिळवून सुपर १२ च्या पहिल्या सामन्यात आत्मविश्वासाने उतरण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---