अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यानं मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर टीका केली आहे. इरफानच्या मते, हार्दिक पांड्यानं सामन्यात दोन चुका केल्या. पहिली म्हणजे जसप्रीत बुमराहला नवीन चेंडू न देणे आणि दुसरी म्हणजे टीम डेव्हिडला त्याच्यापुढे फलंदाजीसाठी पाठवणे.
हार्दिक पांड्यानं गुजरात टायटन्सविरुद्ध नवीन चेंडूनं दोन षटकं टाकली. या दोन षटकांत त्यानं 20 धावा खर्च केल्या. जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झीसारखे घातक गोलंदाज संघात असूनही, स्वत: नवीन चेंडूनं सुरुवात करण्याचा पांड्याचा निर्णय अनेक दिग्गज्जांनाही समजलेला नाही.
इरफान पठाणनं त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं की, “हार्दिक पांड्यानं सामन्यात मोठ्या चुका केल्या. पॉवरप्लेमध्ये त्यानं 2 षटके स्वत: टाकली, जी एक मोठी चूक होती. त्यानं जसप्रीत बुमराहला थोड्या उशिरानं गोलंदाजी दिली.”
हार्दिक पांड्यानं डावाच्या चौथ्या षटकात जसप्रीत बुमराहला आक्रमणात आणलं. बुमराहनंही त्याच्या पहिल्याच षटकात ऋद्धिमान साहाला शानदार यॉर्कर टाकून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. गुजरातविरुद्धच्या या सामन्यात बुमराहनं 4 षटकात केवळ 14 धावा देत तीन विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्यानं एकही विकेट न घेता 30 धावा दिल्या.
टीम डेव्हिडला आपल्या आधी फलंदाजीला पाठवण्याच्या हार्दिकच्या निर्णयावरही इरफान पठाणनं टीका केली आहे. इरफानच्या मते कदाचित हार्दिक पांड्याला राशिद खानचा सामना करायचा नव्हता. म्हणून त्यानं हा निर्णय घेतला.
इरफान पठाण म्हणाला, “जेव्हा मुंबई धावांचा पाठलाग करत होती, तेव्हा हार्दिकनं टीम डेव्हिडला वर फलंदाजीला पाठवलं. राशिद खानचा एक ओव्हर बाकी असतानाही त्यानं हे केलं. मला वाटतंय की हार्दिक पांड्याला राशिद खानविरुद्ध खेळायचं नव्हतं. तो बरेच दिवस झाला क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे कदाचित हे एक कारण असू शकतं. अन्यथा, भारतीय अनुभवी खेळाडूनं ड्रेसिंग रूममध्ये बसावं आणि परदेशी खेळाडूनं राशिद खानविरुद्ध फलंदाजी करावी या निर्णयाचा मी समर्थक नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-