भारताचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला लंडनमध्ये शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. त्याला मागील अनेक दिवसांपासून पाठिच्या दुखापतीचा त्रास होत होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता या शस्त्रक्रियेमुळे त्याला क्रिकेटपासून बराच काळ दूर रहावे लागण्याची शक्यता आहे.
पंड्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. याबद्दल त्याने स्वत:च सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. त्याने हॉस्पिटलमधील त्याचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. लवकरच पुनरागमन करेल. तोपर्यंत माझी आठवण काढत रहा.’
Surgery done successfully 🥳
Extremely grateful to everyone for your wishes ❣️ Will be back in no time! Till then miss me 😉 pic.twitter.com/XrsB8bWQ35
— hardik pandya (@hardikpandya7) October 5, 2019
हार्दिकला या शस्त्रक्रियेमुळे 5 महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर रहावे लागण्याची शक्यता आहे. पण याबदद्ल अजून बीसीसीआय किंवा हार्दिकने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
हार्दिक नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेत खेळला होता. मात्र त्याला त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. याचदरम्यान त्याला पाठिच्या दुखापतीचाही त्रास होत होता. तसेच त्याला ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीही विश्रांती देण्यात आली होती.
हार्दिकला सर्वात पहिल्यांदा मागीलवर्षी दुबईत झालेल्या एशिया कप स्पर्धेत पाठीची दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने या दुखापतीतून बरा होऊन पुनरागमन केले होते. तसेच तो 2019 विश्वचषकातही खेळला. मात्र त्याला विश्वचषकानंतर पुन्हा पाठीच्या दुखापतीचा त्रास जाणवू लागला होता. अखेर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
हार्दिकवर शस्त्रक्रिया झाल्याने भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. याआधी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याने तो सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.