इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दोन्ही संघांदरम्यान ५ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची रंगतदार कसोटी मालिका सुरू होत आहे. दोन्ही संघ विजय रथावर स्वार असल्याने ही मालिका कमालीची अटीतटीची होणार हे जवळपास निश्चित आहे. तत्पुर्वी दोन्ही संघांनी या मालिकेसाठी दर्जेदार खेळाडूंची फौज उभी केलेली दिसते. यजमान भारताने निवडलेल्या संघात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याचे पुनरागमन झाले आहे.
त्यामुळे तब्बल ३ वर्षांनंतर हार्दिक कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. २०१८ साली इंग्लंडविरुद्ध त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाठीच्या दुखापतीमुळे तो गोलंदाजी करू शकत नव्हता. त्यामुळे त्याला कसोटी संघात सहभागी करण्यात आले नव्हते. परंतु आता अष्टपैलू रविंद्र जडेजाला दुखापत झाल्याने तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकला आहे. त्यामुळे त्याच्याजागी हार्दिकला संघात स्थान देण्यात आले आहे.
तीन वर्षांपूर्वी खेळला शेवटचा कसोटी सामना
जुलै २०१७ मध्ये हार्दिकसाठी भारतीय कसोटी संघाची दारे खुली झाली होती. परंतु कसोटी क्रिकेटमधील त्याची लौकिकास न साजेशी खेळी आणि इतर प्रतिभावंत खेळाडूंमुळे त्याला सतत संघातून आत-बाहेर केले जात असते. ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत इंग्लंडविरुद्ध त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. साउथम्पटनच्या द रोज बाऊल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हार्दिक विशेष कामगिरी करू शकला नव्हता.
या सामन्यातील दोन्ही डावात मिळून त्याने ४ धावा केल्या होत्या. तर गोलंदाजीमध्येही त्याने केवळ १ विकेट काढली होती. तेव्हापासून त्याला भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केली प्रशंसनीय कामगिरी
भारतीय संघाच्या नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकेत हार्दिकने कमालीचे प्रदर्शन केले होते. ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १०५ च्या सरासरीने त्याने सर्वाधिक २१० धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ९२ धावा इतकी राहिली. सोबतच दोन सामन्यात अर्धशतकाची नोंद केली होती. याबरोबरच ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत सर्वोच्च नाबाद ४२ धावांच्या खेळीसह त्याने एकूण ७८ धावा केल्या होत्या.
दुखापतीमुळे वनडे आणि टी२० मालिकेत हार्दिकने जास्त गोलंदाजी केली नव्हती. याच कारणामुळे त्याने सध्या चालू असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीतून माघार घेतली. जेणेकरून त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणि येत्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा.
कसोटी क्रिकेटमध्ये मिळाली फार कमी संधी
हार्दिकने श्रीलंकाविरुद्ध २६ जुलै २०१७ मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यातील पहिल्याच डावात त्याने अर्धशतक करण्याचा पराक्रम केला होता. परंतु कसोटी संघातील आपले स्थान कायम राखण्यात तो अपयशी ठरला. या कारणामुळे आजवर हार्दिकने अवघे ११ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान एका शतकाच्या मदतीने ५३२ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना १७ विकेट्स घेतल्या आहेत.
याशिवाय हार्दिकने वनडेत ५७ सामन्यात ११६७ धावा आणि ५५ विकेट्सची कामगिरी केली आहे. तर ४३ टी२० सामने खेळत ३८८ धावा ३८ विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंडविरुद्ध या खेळाडूची घेऊ शकतो जागा
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आता भारतीय संघ व्यवस्थापनासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. ती म्हणजे, अंतिम ११ जणांच्या संघात संधी द्यायची कोणाला. कारण एकिकडे विराट कोहली, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा असे खेळाडू कसोटी संघात पुनरागमन करत आहेत, तर दुसरीकडे युवा क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वांना प्रभावित केले आहे.
असे असले तरी, अष्टपैलू खेळाडूच्या रुपात हार्दिकचा विचार केला जाऊ शकतो. त्यानुसार त्याला इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटींदरम्यान रविंद्र जडेजा ऐवजी अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान दिले जाऊ शकतो. जडेजा दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“तुमचा मुलगा असल्याचा अभिमान वाटतो”, मोहम्मद शमीची वडिलांसाठी भावूक पोस्ट
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम; विराट व रोहित आहेत ‘या’ क्रमांकावर






