भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी20 मालिका नुकतीच संपली. या मालिकेत युवा शुबमन गिल भारतीय संघाचा कर्णधार होता. या मालिकेसाठी संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.
आता या महिन्याच्या अखेरीस भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय आणि टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपासून गौतम गंभीर भारतीय संघाचं मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणार आहे. या मालिकेसाठी देखील रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारतीय वनडे संघाचं नेतृत्व करू शकतो. तर टी20 ची कमान अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे सोपवली जाऊ शकते.
मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अनुपलब्ध असणार आहे. हार्दिकनं बीसीसीआयला कळवलं आहे की, तो वेयक्तिक कारणांमुळे श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळू शकणार नाही. भारतीय संघ 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान श्रीलंकेविरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे.
रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, गौतम गंभीर श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित, विराट आणि बुमराह यांना संघात घेण्यासाठी आग्रही आहे. मात्र अजून या खेळाडूंकडून कुठलंही उत्तर आलेलं नाही. सध्या हे सर्व क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबासह विदेशात सुट्यांचा आनंद घेत आहेत.
सूत्रांनुसार, टी20 मालिकेसाठी कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवच्या नावाचा देखील विचार केला जाऊ शकतो. टीम मॅनेजमेंटला फीडबॅक मिळाला आहे की, सूर्याच्या नावाला भारताच्या ड्रेसिंग रुममधून पसंती आहे. मात्र अजूनही या शर्यतीत हार्दिक पांड्याचं नाव पुढे आहे. हार्दिक नुकत्याच संपलेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधार होता आणि त्यानं भारताला विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाचं योगदान दिलं होतं. त्यामुळे तो निवडकर्त्यांची पहिली पसंती आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“दुखापतीतून ज्या पद्धतीने..”, बुमराहच्या पुनरागमनाबाबत माजी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणाले…
“प्रसिद्धी आणि सत्तेने विराट बदलला, तर रोहितचा स्वभाव..”, संघातील सहकारी खेळाडूनेच केले खळबळजनक विधान
रोहित-विराटनंतर संघात त्यांची जागा कोण घेणार? भारताच्या माजी प्रशिक्षकानं दिली प्रतिक्रिया