हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून सातत्यानं चर्चेत आहे. तो अलीकडेच पत्नी नताशा स्टॅनकोविचपासून वेगळा झाला. त्याआधी 2024 टी20 विश्वचषकात त्यानं चमकदार कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात हार्दिकचं योगदान महत्त्वपूर्ण होतं.
आता हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो त्याच्या फिटनेसमुळे. वास्तविक, हार्दिकच्या गोलंदाजी फिटनेसवर प्रश्न उपस्थित होत आहेत. रिपोर्टनुसार, 2025 मध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीची चाचणी घेतली जाईल. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये हार्दिकच्या गोलंदाजीवर लक्ष ठेवलं जाणार आहे.
2025 चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे फॉर्मेटमध्ये खेळली जाणार आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती आणि काही सामन्यांनंतर त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. हार्दिकची दुखापत हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. विशेषत: एकदिवसीय फॉर्मेटमध्ये हार्दिकवर 10 षटकं गोलंदाजी करण्याची जबाबदारी असते, ज्यामुळे त्याच्यावरचा ताण वाढतो.
‘टाईम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी डिसेंबरमध्ये खेळल्या जाणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये हार्दिकच्या गोलंदाजी फिटनेसवर लक्ष ठेवलं जाईल. म्हणजेच हार्दिक पांड्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बीसीसीआयनं भारतीय खेळाडूंना यापूर्वीच देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. 2024 आयपीएलमध्ये हार्दिकनं जास्त गोलंदाजी केली नव्हती. मात्र, आयपीएलनंतर झालेल्या टी20 विश्वचषकात हार्दिकनं गोलंदाजीत शानदार कामगिरी केली. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हार्दिकच्या गोलंदाजीवर सर्वांच्या नजरा असतील.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हीव्हीएस लक्ष्मणला आयपीएलमध्ये मिळू शकते मोठी जबाबदारी, या संघाकडून मिळणार ऑफर!
शेवटच्या सामन्यात शतक…तरीही संजू सॅमसनला संघातून का वगळलं?
नताशाला घटस्फोट दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच हार्दिक पांड्या आणि ‘ही’ अभिनेत्री इन्स्टावर बनले फ्रेंड