रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु पाकिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी केली आणि भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला होता, ज्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आता त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
भारतीय संघाची फलंदाजी झाल्यानंतर हार्दिक पंड्याला वेदना जाणवू लागल्या होत्या, ज्यामुळे तो मैदानाबाहेर गेला होता. तर दुसऱ्या डावात ईशान किशन क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर आला होता. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ‘हार्दिक पंड्या आता ठीक आहे. दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याचा स्कॅन करण्यात आला होता. कारण संघ व्यवस्थापनाला या खेळाडूबाबत कोणतीही हयगय करायची नव्हती.’ भारतीय संघाचा पुढील सामना ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे.
हार्दिक पंड्या गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यानंतर त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले होत. परंतु तो गोलंदाजी करताना दिसून येत नाहीये. त्याला या संघात फलंदाज म्हणून स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी त्याने म्हटले होते, तो नॉकआऊट सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना दिसून येईल.
दरम्यान या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहलीने ५७ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने ३९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद १५१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने नाबाद ७९ आणि बाबर आजमने नाबाद ६८ धावा करत पाकिस्तान संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
तोडफोड फलंदाजी! अफगानी फलंदाजाचा सॉलिड षटकार अन् सीमारेषेपार असलेल्या फ्रीजच्या फुटल्या काचा