आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ याची नोव्हेंबर महिन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून निवड केली आहे. त्यानं भारताचा जसप्रीत बुमराह आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को यान्सन यांना मागे टाकत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आपल्या नावे केला. या पाकिस्तानी गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी20 मालिकेत चांगली कामगिरी केली होती.
पाकिस्ताननं तब्बल 22 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकली. रौफ या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. त्यानं 3 सामन्यात 12 च्या उत्कृष्ट सरासरीनं 10 बळी घेतले होती. त्याची सर्वोत्तम कामगिरी 5/29 होती. टी20 मालिकेतही रौफची कामगिरी अप्रतिम होती. त्यानं 3 सामन्यात 15.40 च्या उत्कृष्ट सरासरीनं 5 बळी घेतले. त्याची सर्वोत्तम कामगिरी 4/22 होती. यानंतर त्यानं झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही 3 बळी घेतले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद प्रत्येक महिन्याला तीन खेळाडूंना ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकित करते. नोव्हेंबर महिन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह, हारिस रौफ आणि मार्को यान्सन यांचा समावेश होता. जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 8 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होतं. मात्र हरिस रौफनं त्याच्यावर मात करत बाजी मारली आहे.
हारिस रौफच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास, या 31 वर्षीय गोलंदाजानं बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानसाठी पदार्पण केलं. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 78 टी20 सामन्यांमध्ये 110 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावे 43 एकदिवसीय सामन्यांमध्ये 82 विकेट्स आहेत. त्यानं इंग्लंडविरुद्ध 2022 मध्ये एकमेव कसोटी सामना खेळला, ज्यात तो एक विकेट घेण्यात यशस्वी ठरला.
हेही वाचा –
बाबर आझमची कसोटीपाठोपाठ टी20 संघातूनही हकालपट्टी होणार? गेल्या 10 सामन्यांतील आकडेवारी खूपच लाजिरवाणी
आयसीसी क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडला मोठा फायदा! भारतीय खेळाडूंची घसरण
काय सांगता! वेळेवर न आल्यामुळे या खेळाडूला सोडून निघून गेली टीम इंडिया!