शुक्रवारी (1 नोव्हेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडीज महिला (Indian Womens vs West Indies Womens) संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड अँटिग्वा येथे पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडीज महिलांनी 1 धावेने विजय मिळवला.
या अटीतटीच्या सामन्यात भारताला जरी पराभव स्विकारावा लागला असला तरी भारताची स्टार फलंदाज हरमनप्रीत कौरने(Harmanpreet Kaur) घेतलेल्या एका अफलातून झेलची चांगलीच चर्चा झाली.
तिने प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाच्या स्टॅफॅनी टेलरचा डावाच्या शेवटच्या चेंडूवर एका हाताने झेल घेतला. त्यावेळी स्टॅफॅनी 94 धावांवर खेळत होती. तिला शतक पुर्ण करण्यासाठी केवळ 6 धावांची आवश्यकता होती.
त्यामुळे तीने मोठा फटका मारण्याच्या नादात लाँग – ऑनच्या दिशेने चेंडू मारला. परंतु, हरमनप्रीतने हुशारीने बाउंड्री लाईन जवळ याेग्य वेळी उंच उडी मारून डाव्या हातात चेंडू झेलला आणि टेलरला झेलबाद केले. हरमनप्रीतने घेतलेला अविश्वसनीय झेल पाहुन टेलरलाही आश्चर्य वाटले.
https://twitter.com/merin_kumar/status/1190377510967472128
या सामन्यात टेलरने केलेल्या 94 धावांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजच्या महिला संघाने 50 षटकात 7 बाद 225 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 226 धावांचे आव्हान दिले.
या धावांचा पाठलाग करताना भारताकडून प्रिया पुनियाने उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली. त्यामध्ये तिने 107 चेंडूत 75 धावा केल्या. यात 6 चौकारांचा समावेश होता. तिला तिची सलामीवीर साथीदार जेमिमा रोड्रिगेजने 41 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.
भारताला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात केवळ 8 धावा करायच्या होत्या. पण शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाला 2 धावांची गरज असताना पूनम यादव बाद झाली. त्यामुळे भारताचा डाव 224 धावांवर संपूष्टात आणि भारताला सामनाही 1 धावेने गमवावा लागला.
https://twitter.com/imfemalecricket/status/1190463353673539584





