भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या मिताली राज आणि महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे पोवार यांना प्रशिक्षकपदही गमावावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण आता भारतीय महिला संघाची टी20 कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्म्रीती मानधनाने बीसीसीआयला पत्र लिहून पोवार यांना पाठिंबा दिला आहे.
कौर आणि मानधनाने पोवार यांना 2021 पर्यंत प्रशिक्षक म्हणून कायम करा, असे म्हणून पाठिंबा दिला आहे. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समीतीचे (सीओए) अध्यक्ष विनोद राय यांनी पीटीआयला माहिती दिली आहे.
पोवार यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी 30 नोव्हेंबरला संपुष्टात आला असून बीसीसीआयने नवीन प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. तसेच पोवार हे देखील पुन्हा प्रशिक्षकपदासाठी अर्ज करु शकतात.
याबद्दल राय म्हणाले, ‘हो, कौर आणि मानधनाने पत्र लिहून रमेश पोवार यांना कायम करण्याची मागणी केली आहे.’
या प्रकरणाबद्दल पीटीआयने दिलेल्या वृत्तात हरमनप्रीत कौरने म्हटले आहे की, ‘मी, टी20 संघाची कर्णधार आणि वनडे संघाची उपकर्णधार म्हणून विनंती करते की पोवार यांना संघाचे प्रशिक्षक म्हणून कायम करा. पुढील टी20 विश्वचषकासाठी जवळ जवळ फक्त 15 महिने राहिले आहेत आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी 1 महिनाच उरला आहे.’
‘त्यांनी आम्हाला ज्याप्रकारे एक संघ म्हणून बदलले आहे, ते बघून मला वाटत नाही की त्यांना बदली करण्यासाठी कोणते कारण आहे.
तसेच तिने पुढे म्हटले आहे, ‘टी20 विश्वचषकातील उपांत्य फेरीतील पराभव निराशाजनक होता. तसेच त्यानंतर जे वाद झाले ते पाहून जास्त वाईट वाटले. त्या सगळ्या प्रकरणामुळे आमची प्रतिमा आणि संघातील एकतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.’
‘सर रमेश पोवार यांनी आमची फक्त खेळाडू म्हणून सुधारणा घडवून आणली नाही, तर त्यांनी लक्ष्य निर्धारित करण्यासाठी आणि आमच्या स्वतःच्या मर्यादांना आव्हान देण्यासाठी प्रेरिकही केले. त्यांनी तांत्रिकदृष्या आणि रणनीतीकदृष्ट्याही भारतीय महिला संघाचा चेहरा बदलला आहे.’
त्याचबरोबर कौरने मिताली राजला टी20 विश्वचषकातील इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यातून वगळण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला असल्याचेही सांगितले आहे.
ती म्हणाली, ‘मिताली राजला वगळण्यामध्ये फक्त सर रमेश पोवार एकटे जबाबदार नव्हते. तो निर्णय क्रिकेटच्या तर्कशास्त्राने आणि मागील काही गोष्टींच्या निरिक्षणानंतर घेण्यात आला होता.’
‘त्यावेळेची गरज बघता मी, स्म्रीती आणि निवड समीती सदस्य सुधा शहा आणि प्रशिक्षक आम्ही एकत्रितपणे आमचे व्यवस्थापकांसमोर निर्णय घेतला होता की आॅस्ट्रेलिया विरुद्धचा विजयी संघच उपांत्य सामन्यासाठी कायम ठेवायचा.’
‘माझा विश्वास आहे की हे सर्व तूमच्या लक्षात येईल की कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी नाही तर संघासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.’
तसेच कौरने असेही म्हटले आहे की प्रशिक्षक बदलल्याने संघाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होईल. ती म्हणाली, ‘परत प्रशिक्षक बदलीमुळे आमच्या प्रगतीवर परिणाम होईल आणि आम्हाला परत सुरुवातीपासून सुरु करावे लागेल.’
तसेच ती पुढे म्हणाली, ‘मिताली राज आणि रमेश पोवार यांचे जे वाद आहेत ते त्यांनी कुटुंबासारखे एका टेबलवर बसून सोडवावेत आणि हा संघर्ष संपवावा. हेच संघासाठी आणि त्यांच्यासाठी जास्त योग्य आहे.’
त्याचबरोबर स्म्रीती मानधनानेही कौरला पाठिंबा दिला आहे आणि म्हटले आहे की पोवार यांनी तिला आणखी चांगले क्रिकेटपटू बनवले आहे.
तिने पत्रात म्हटले आहे की, ‘पोवार यांची ओळख झाल्यापासून त्यांनी सपोर्ट स्टाफबरोबर आम्हाला संघ म्हणून सलग 14 टी20 सामने जिंकण्यासाठी मदत केली आहे आणि आमच्यामधील विश्वास वाढवला आहे. त्यांनी खेळाडूंचा हेतू बदलून सर्वांमध्ये आत्मविश्वास भरला आहे.’
कौर आणि मानधनाने जरी पोवार यांना पाठिंबा दिला असला तरी भारतीय महिला संघातील एकता बिश्त आणि मानसी जोशी यांचा मिताली राजला पाठिंबा असल्याचेही वृत्त आहे.
भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 14 डिसेंबर ही आहे.
मिताली राज – रमेश पोवार वाद-
भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज मिताली राजला काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 11 जणींच्या भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे अनेकांनी संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते.
या प्रकरणानंतर मितालीनेही बीसीसीआयला पत्र लिहून भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवारांवर अपमानास्पद वागणूकीचा आणि भेदभाव करण्याचा आरोप केला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेली समिती (सीओए) सदस्य डायना एडलजी यांच्यावरही तिने यांच्यावरही भेदभाव केल्याचा आरोप केला होता.
पण तिच्या या आरोपांना उत्तर देताना हे सर्व आरोप पोवार यांनी नाकारले आहेत. तसेच तिला तिच्या कमी स्ट्राइक रेटमुळे संघात न घेण्याचे कारण पोवार यांनी स्पष्ट केले आहे.
पोवार यांना माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी राजीनामा दिल्यानंतर महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
एशिया कप स्पर्धेनंतर काही भारतीय वरिष्ठ खेळाडूंनी प्रशिक्षक बदलण्याची मागणी केल्याने आरोठे यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: आज इंग्लंडसमोर असणार गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचे आव्हान
–टीम इंडियाला आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोलाचा सल्ला…
–ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहलीला हा खास विक्रम करण्याची संधी
–हॉकी विश्वचषक २०१८: चीन-आयर्लंड पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत
–हॉकी विश्वचषक २०१८: अर्जेंटिनाचा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल