भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केली नाही. विश्वचषकातील पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबियाविरुद्ध भारतीय संघाने चांगली कामगिरी करत स्पर्धेत परतण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय संघ स्पर्धेबाहेर झाला. या पराभवानंतर भारतीय गोलंदाजांबाबत खूप चर्चा झाली. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात हर्षल पटेलने जबरदस्त कामगिरी केली होती. यावर रॉबिन उथप्पाने एक मोठे विधान केले आहे.
हर्षल पटेल डेथ ओव्हर्समध्ये जसप्रीत बुमराहसोबत चांगली गोलंदाजी करू शकतो आणि त्यामुळे भारतीय संघाची गोलंदाजी मजबूत होईल, असे मत अनुभवी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने व्यक्त केले आहे. डेथ ओव्हर्समध्ये हर्षल ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यामुळे उथप्पा खूपच प्रभावित झाला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० मध्ये हर्षलच्या चमकदार कामगिरीवर रॉबिन उथप्पाने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, हर्षल पटेल ज्या प्रकारे डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करतो ते पाहता जसप्रीत बुमराहसोबत त्याची जोडी प्रतिस्पर्धी संघासाठी खूपच धोकादायक ठरू शकते.
एका कार्यक्रमात उथप्पा म्हणाला, “डेथ ओव्हर्सबद्दल सांगायचे झाले तर, हर्षल पटेल नक्कीच जबरदस्त गोलंदाज आहे. बुमराहसोबत तो खूप चांगला सिद्ध होऊ शकतो. हर्षल त्याची योजना खूप चांगल्या प्रकारे अमलात आणू शकतो. दबावाखालीही तो खूप चांगली कामगिरी करतो. १९व्या षटकात त्याला ग्लेन फिलिप्सने षटकार ठोकला आणि त्यानंतर त्याने नो बॉल टाकला. पण त्यानंतर तो ज्या पद्धतीने परतला ते कौतुकास्पद होते.”
याआधी न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीनेही हर्षल पटेल आणि बुमराहची जोडी टी२० मध्ये खूप धोकादायक ठरू शकेल असे म्हटले होते. हर्षलने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. हर्षलने ४ षटकात २५ धावा देत २ बळी घेतले. त्याच्या जबरदस्त कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पहिल्याच सामन्यात सामनावीर मिळणे ही मोठी गोष्ट आहे.