विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. या संघाने आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ७ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.या संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्याची सुवर्णसंधी आहे. कारण, संघातील गोलंदाज आणि फलंदाज सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. दरम्यान, वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली आहे. तसेच एक मोठा कारनामा करण्यापासून तो अवघी काही पाऊले दूर आहे.
सर्वात मोठ्या विक्रमापासून काही पाऊले दूर
हर्षल पटेलने आयपीएल २०२१ अप्रतिम कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात जेव्हा संघ अडचणीत होता, त्यावेळी हर्षलने निर्णायक षटक टाकले होते. त्याने हॅट्रिक घेऊन रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या नावे आता ११ सामन्यात २७ गडी बाद करण्याची नोंद झाली आहे. तसेच त्याला आयपीएल स्पर्धेत मोठा विक्रम करण्यासाठी आणखी ७ फलंदाजांना माघारी पाठवावे लागेल.
हर्षल पटेल आयपीएल २०२१ स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज आवेश खान १८ गडी बाद करण्यासह दुसऱ्या स्थानी आहे. हर्षल पटेलची कामगिरी पाहता हे जवळ जवळ निश्चित झाले आहे की, यंदाची पर्पल कॅप हर्षल पटेल मिळवणार. तर, आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक गडी बाद करण्याचा पराक्रम ड्वेन ब्रावोने केला आहे. त्याने २०१३ मध्ये झालेल्या स्पर्धेत ३२ गडी बाद केले होते.जर हर्षल पटेलला उर्वरित सामन्यात ७ गडी बाद करण्यात यश आले तर तो ड्वेन ब्रावोचा विक्रम मोडून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरू शकतो.
या बाबतीत युजवेंद्र चहलला टाकले मागे
राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हर्षल पटेलने मोठा कारनामा केला होता. तो आयपीएल स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक गडी बाद करणारा अनकॅप खेळाडू ठरला होता. यापूर्वी, युजवेंद्र चहलने असा कारनामा केला होता. त्याने २०१५ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत २३ गडी बाद केले होते. तर, हर्षल पटेलने आतापर्यंत एकूण २६ गडी बाद केले आहेत.
आयपीएल स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक गडी बाद करणारे अनकॅप खेळाडू
हर्षल पटेल – २६ गडी, २०२१*
युझवेंद्र चहल – २३ गडी , २०१५
श्रीनाथ अरविंद – २१ गडी,२०११
सिद्धार्थ कौल – २१ गडी, २०१८






