भारतीय संघात नुकतेच पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आज त्याचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. हर्षलचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच २३ नोव्हेंबर १९९० रोजी गुजरातमधील साणंद शहरात झाला. पटेलने २००८-२००९ मधील विनू मंकड ट्रॉफीमध्ये एकूण २३ बळी घेत लक्षवेधी कामगिरी केली. विनू मंकड ट्रॉफीमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचा परिणाम असा झाला की त्याला गुजरातकडून खेळण्याची संधी मिळाली. यानंतर त्याने २०१० च्या अंडर-१९ विश्वचषकातही भाग घेतला होता.
पटेल याच्या कारकिर्दीतही चढ-उतार आले. यादरम्यान त्याला गुजरात संघातूनही वगळण्यात आले, परंतु त्याने हिंमत सोडली नाही आणि हरियाणासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याने २०११-२०१२ च्या हंगामात २८ बळी घेत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
आयपीएलचा १४ वा हंगाम त्याच्यासाठी उत्कृष्ट ठरला. या हंगामात त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी १५ सामने खेळून त्याने १५ डावांत १४.३४ च्या सरासरीने ३२ बळी घेतले आणि २०२१ च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तो गोलंदाज ठरला.
आयपीएलमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला बक्षीसही मिळाले आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरगुती टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी प्रथमच त्याची भारतीय संघात निवड झाली. हर्षलला पहिल्या टी२० सामन्यात मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. मात्र, सिराजच्या अपयशानंतर त्याला देशासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टी२० सामन्यात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
त्याच्या पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने घातक गोलंदाजी करताना २५ धावांत दोन बळी घेतले. यादरम्यान त्याने ज्या दोन्ही खेळाडूंना आपली शिकार बनवले त्यात सलामीवीर डॅरिल मिशेल आणि मधल्या फळीतील ग्लेन फिलिप्सचे नाव होते. पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल पटेलला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.
त्याचवेळी दुसऱ्या सामन्यातही त्याने चांगली कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना त्याने संघासाठी १८ धावांचे योगदान दिले. यानंतर गोलंदाजी करताना दोन महत्त्वाचे बळी घेतले. या सामन्यादरम्यान त्याच्या नावावर एक लज्जास्पद विक्रमही जमा झाला. यापूर्वी, विद्यमान उपकर्णधार केएल राहुल हाच देशासाठी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिट विकेट पद्धतीने बाद झाला होता. परंतु, तिसऱ्या टी२० सामन्यात हिट विकेट होऊन तो देखील या यादीत सामील झाला.
याशिवाय, भारतीय संघासाठी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो सहावा सर्वात वयस्कर खेळाडू आहे.
याशिवाय त्याच्या देशांतर्गत क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये २२६, लिस्ट ए क्रिकेटमध्ये ८० आणि टी२० क्रिकेटमध्ये १४२ बळी घेतले आहेत. तर, फलंदाजी करताना त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १३६३ धावा, लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५७९ आणि टी२० क्रिकेटमध्ये ९४९ धावा केल्या आहेत.