जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामातील साखळी फेरीचे संपन्न झाल्यानंतर पहिला क्वालिफायर सामनादेखील खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी एलिमिनेटर सामन्यात सोमवारी (११ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने येतील. या सामन्यात उतरताना बेंगलोरचा प्रमुख वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याच्याकडे आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विक्रम मोडण्याची संधी असेल.
पर्पल कॅपचा मानकरी आहे हर्षल
आयपीएल २०२१ पूर्वी दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रेड केलेला अष्टपैलू हर्षल पटेल यावर्षी बेंगलोरसाठी चांगलाच फायदेशीर ठरला. कोणालाही अपेक्षा नसताना त्याने आतापर्यंत स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करताना १४ सामन्यांमध्ये तब्बल ३० बळी आपल्या नावे केले आहेत. कोरोना महामारीमुळे स्पर्धेतून स्थगित केली असताना ७ सामन्यांमध्ये १७ बळी मिळवले होते. तर, स्पर्धेच्या उत्तरार्धात त्याच्या नावे ७ सामन्यात १३ बळी आहेत. दुसऱ्या स्थानी असलेला आवेश खान त्याच्यापेक्षा खूपच मागे असल्याने पर्पल कॅप त्याच्याकडेच राहण्याची शक्यता अधिक आहे.
ब्रावोचा तो विक्रम निशाण्यावर
हर्षल पटेल ३० बळींसह या वर्षी पर्पल कॅपचा मानकरी होण्याचा मोठा दावेदार असला तरी, आयपीएल इतिहासातील एक मोठा विक्रम नोंदविण्याची संधी त्याच्याकडे असेल. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचा मान त्याच्याकडे जाऊ शकतो. सध्या हा विक्रम चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी अष्टपैलू ड्वेन ब्रावोच्या नावावर आहे. ब्रावोने २०१३ आयपीएलमध्ये एका हंगामात ३२ बळी मिळवले होते. यासाठी त्याने १६ सामने खेळलेले.
हर्षलला मिळू शकतात तीन संधी
बेंगलोर संघ पहिल्या एलिमिनेटरमध्ये कोलकाता विरूद्ध जिंकल्यास ते दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध भिडतील. या सामन्यातही विजय मिळवून ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. यामूळे हर्षलला हा विक्रम मोडण्यासाठी तीन संधी मिळू शकतात.