माजी हॉकीपटू आणि हरियाणा सरकारमधील क्रीडा मंत्री संदीप सिंह यांनी आपल्यावर झालेल्या शोषणाच्या आरोपानंतर आपल्या विभागाचे काम मुख्यमंत्र्यांकडे सोपवले आहे. संदीप सिंग यांच्यावर एका कनिष्ठ महिला प्रशिक्षकाने छेडछाड आणि विनयभंगाचा आरोप केला होता. यानंतर चंदीगड पोलिसांनी त्याच्यावर एफआयआर नोंदवला असून, त्यानंतर संदीप यांनी तपास पूर्ण होईपर्यंत आपण क्रीडा विभागाचे काम पाहणार नसल्याचे जाहीर केले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून त्यांनी आपला कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे.
एका महिला प्रशिक्षकाने काही दिवसांपूर्वीच संदीप यांनी आपला लैंगिक छळ केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावे अशी मागणी त्या प्रशिक्षकाने मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे केली होती. त्यानंतर आता स्वतः संदीप यांनी राजीनामा न देता केवळ आपल्या पदाचा कार्यभार सोडला आहे.
काय होते आरोप?
संबंधित महिला प्रशिक्षकाने आरोप लावताना म्हटलेले,
“संदीप यांनी मला जिममध्ये पाहिले आणि त्यानंतर सोशल मीडियाद्वारे माझ्याशी संवाद साधला. नॅशनल गेम्समधील प्रमाणपत्राचे कारण सांगत त्यांनी मला भेटण्यास बोलावले. माझे हे प्रमाणपत्र गहाळ झाले असल्याने मी त्यांच्या घरी भेटण्यास राजी झाले. तेथे त्यांनी माझ्याशी गैरवर्तन करत माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.”
संदीप यांनी मात्र या सर्व आरोपांचे खंडन केले असून, आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे.
संदीप सिंग यांची गणना भारताच्या दिग्गज हॉकीपटूंमध्ये होते. ते भारताच्या हॉकी संघाचे कर्णधारही राहिले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यावर सुरमा हा चित्रपट ही आला होता. 2019 विधानसभा निवडणुकांमवेळी भाजपच्या तिकिटावर कुरुक्षेत्र येथील पहावा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे सरकारमध्ये क्रीडा मंत्रालयाचा भार सोपवण्यात आला.
(Haryana Sports Minister Sandeep Singh Accused Of Harrasment)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला आता सुट्टीच नाही! 2023मध्ये आशिया चषक, वर्ल्डकपसह खेळणार तब्बल ‘इतके’ सामने
पंतबाबत मोठी अपडेट! उपचारांचा चांगला परिणाम, रोहितही बोलला डॉक्टरांशी