प्रो कबड्डीमध्ये आज ७६ वा सामना पुणेरी पलटण आणि हरयाणा स्टीलर्स या दोन संघात होणार आहे. हे दोन्ही संघ ‘झोन ए’ मध्ये आहेत. प्रो कबड्डीचा निम्मा मोसम संपला असला तरीदेखील एकाच झोनमध्ये असणारे हे संघ आजवर आपसात भिडले नव्हते. त्यामुळे या सामन्याची क्रीडा रसिकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.
पुणेरी पलटणचा संघ डिफेन्समध्ये खूप मजबूत आहे. मागील पाच सामन्यात पलटणने तीन सामन्यात विजय मिळवला आहे तर दोन सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला आहे. मागील सामन्यात त्यांना मोठ्या उलटफेरला सामोरे जावे लागले होते . त्यांना मागील सामन्यात बेंगलूरु बुल्सने पराभवाचा धक्का दिला होता. दोन्ही संघाच्या डिफेन्सने वर्चस्व स्थापन केलेल्या सामन्यात पुणेरी पलटणला २०-२४ अशी हार पत्करावी लागली. या सामन्यात मोक्याच्या वेळी पुणेरी पलटणच्या डिफेन्सने विरोधी संघाला गुण बहाल केले.
पुणेरी पलटणच्या रेडींगची जबाबदारी पूर्णपणे दीपक निवास हुड्डा आणि राजेश मंडल यांच्यावर असणार आहे. पलटणचा तिसरा मुख्य रेडर मोरे जी.बी. याने काही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्याला जास्त जबाबदारी घेऊन सामन्याचा निकाल पुणेरी संघाच्या बाजूने लागेल याची दक्षता घ्यावी लागेल.
हरयाणा स्टीलर्सचा संघ घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात उत्तम कामगिरी करत आहे. त्यांनी मागील चार सामन्यात दोन विजय, एक पराभव आणि एक सामना बरोबरीत सोडवला आहे. तेलुगू टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु मागील सामन्यात त्यांनी दबंग दिल्लीला संघावर मात करत विजयी लय परत मिळवली आहे.
१२ तारखेला झालेल्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यात रेडींगमध्ये वजीर सिंग आणि डिफेन्समध्ये कर्णधार सुरींदर नाडा यांनी उत्तम कामगिरी केली. वजीरने एक पाच गुणांची केलेली रेड या सामन्याचा निकाल लावण्यासाठी पुरेशी ठरली. या सामन्यात प्रशांत कुमार राय आणि दीपक दहिया यांच्याकडून रेडींगमध्ये चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.
या सामन्यात दोन्ही संघाला विजयाची सामान संधी आहे. परंतु घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा फायदा हरियाणा संघाला होऊ शकतो. त्या सामन्यात देखील डिफेन्सचा बोलबाला असण्याची चिन्हे आहेत. रेडींगमध्ये वजीर सिंग आणि राजेश मंडल यांच्यावर सर्व नजारा असतील.