बाबर आझम आणि त्याच्या संघाचा टी२० विश्वचषक २०२१ मधील प्रवास अत्यंत प्रशसंनीय राहिला. सुपर १२ फेरीतील प्रत्येक सामन्यात थरारक विजय मिळवणाऱ्या पाकिस्तान संघाला यंदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने त्यांचा अपेक्षाभंग केला. ऑस्ट्रेलिया संघाने ५ विकेट्स राखून हा सामना खिशात घातला आणि पाकिस्तानचा टी२० विश्वचषकातील प्रवास तिथेच संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या मॅच विनिंग प्रदर्शनाबरोबरच पाकिस्तानी खेळाडूंच्या काही छोट्या छोट्या चुकींमुळे त्यांना हा महत्त्वपूर्ण सामना गमवावा लागला. त्यातही हसन अलीने १९ व्या षटकात मॅथ्यू वेडचा सोडलेला सोपा झेल सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला. यानंतर पाकिस्तानी चाहत्यांच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्टपणे दिसत होती. त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
उपांत्य फेरी सामन्याचा टर्निंग पाँईट
पाकिस्तानच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस अंतिम षटकात फलंदाजी करत होते. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने शाहिन आफ्रिदीला १९ वे षटक टाकण्यासाठी बोलावले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाला अंतिम २ षटकात विजयासाठी २२ धावांची गरज होती. पहिला चेंडू निर्धाव राहिल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर स्टॉयनिसने एक धाव घेतली.
पुढे आफ्रिदीने पहिल्यांदा तिसरा चेंडू वाईड टाकला. त्यामुळे पुन्हा एकदा त्याला तो चेंडू टाकावा लागला आणि यावर वेडने मिडविकेटच्या दिशेने शॉट खेळला. त्याने मारलेल्या फटक्याचा चेंडू सरळ मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या हसन अलीजवळ गेला आणि दुर्दैवाने त्याने इतका सोपा झेल सोडला. अशाप्रकारे वेडला जास्तीच्या २ धावा मिळाल्या आणि सोबतच जीवनदानही मिळाले. पुढे हाच वेड पाकिस्तानसाठी कर्दनकाळ ठरला. त्याने आफ्रिदीच्या १९ व्या षटकातील शेवटच्या ३ चेंडूंवर सलग ३ षटकार ठोकले आणि संघाला ६ चेंडू राखून सामना जिंकून दिला.
U can see just two crying child 😢😢 but just due to @RealHa55an broke the heart of millions people…. Game is game but on this stage don’t allow any mistake . pic.twitter.com/Uywxvrq6MA
— AbubakrSonu (@Abubakrsonu) November 11, 2021
यानंतर पाकिस्तान संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये आलेले पाकिस्तानी चाहते भावुक झाल्याचे दिसले. अगदी लहान लहान मुलेही डोक्याला हात लावून बसलेली दिसली. त्यातील अनेकांना आपले अश्रू अनावर झाले होते. एक चिमुकला तर हसन अलीला पाकिस्तानच्या पराभवासाठी जबाबदार धरत त्याला संघाबाहेर करण्याची मागणी करत ढसाढसा रडताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Please support Hassan Ali pic.twitter.com/b03k4Rs5AR
— sohail (@sohailyounus2) November 11, 2021
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात त्यांचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघ असेल. न्यूझीलंडने पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. १४ नोव्हेंबर रोजी दुबईत हा सामना रंगेल.
महत्वाच्या बातम्या-
ओ देस मेरे! सकाळी आयसीमधून डिस्चार्ज मिळाला अन् संध्याकाळी ‘त्याने’ देशासाठी खेळताना अर्धशतक ठोकले
सेमी फायनल गमावली, पण पाकिस्तानच्या रिझवानचा ‘भीमपराक्रम’; टी२०त एका वर्षात कुटल्या १००० धावा