भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या चेन्नई येथे कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा 24 वर्षीय वेगवान गोलंदाज हसन महमूदनं अशी कामगिरी केली, जी यापूर्वी कोणताही बांगलादेशी खेळाडू करू शकलेला नाही.
वास्तविक, बांगलादेशच्या कोणत्याही गोलंदाजानं प्रथमच भारतात कसोटी सामन्यात एका डावात पाच बळी घेतले आहेत. याशिवाय हसन महमूद हा सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये पाच विकेट घेणारा बांगलादेशचा केवळ दुसरा गोलंदाज ठरला. याआधी गेल्या महिन्यात त्यानं पाकिस्तानविरुद्धही पाच विकेट घेतल्या होत्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हसन महमूदनं जसप्रीत बुमराहला बाद करून भारताचा डाव संपवला. याआधी त्यानं पहिल्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि रिषभ पंत यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.
भारत दौऱ्यावर आलेल्या आशियाई संघांबद्दल बोलायचं झालं तर, शेवटच्या वेळी पाकिस्तानच्या यासिर अराफातनं एका डावात पाच बळी घेतले होते. यासिरनं 2007 मध्ये बंगळुरू कसोटीत ही कामगिरी केली होती. याशिवाय, चेन्नईच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांनी एका डावात 9 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची ही केवळ सहावी वेळ आहे.
1949 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात वेगवान गोलंदाजांनी एका डावात 10 विकेट घेतल्या होत्या. यानंतर 1985 च्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यातही वेगवान गोलंदाजांनी एका डावात 10 विकेट घेतल्या होत्या. 1934 च्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात वेगवान गोलंदाजांनी मिळून 9 विकेट घेतल्या, 1975 च्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजांनी दोन्ही डावात प्रत्येकी 9 विकेट घेतल्या. 1979 मध्ये वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांनी एका डावात 9 विकेट घेतल्या होत्या आणि आता बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी एका डावात 9 विकेट घेतल्या आहेत.
बांगलादेशसाठी महमूदशिवाय तस्किन अहमदनं तीन आणि नाहिद राणानं एक बळी घेतला. तर फिरकी गोलंदाज मेहेंदी हसन मिराजनं एक विकेट घेतली. भारताकडून आर अश्विनने 113 धावांची खेळी खेळली, तर रवींद्र जडेजानं 86 धावांचं योगदान दिले. यशस्वी जयस्वाल 56 धावा करून बाद झाला.
हेही वाचा –
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या प्रशिक्षकाची आयपीएलमध्ये एंट्री, या संघानं सोपवली मोठी जबाबदारी
संजू सॅमसनचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, शतक झळकावून ठोकला कसोटी संघासाठी दावा
ind vs ban; 376 धावांत भारतीय संघ आटोपला, दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या खात्यात केवळ 37 धावा