---Advertisement---

तब्बल १३ वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने टी२०मध्ये घेतली हॅट्रिक!

---Advertisement---

काल (21 फेब्रुवारी) जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (South Africa vs Australia) संंघात 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 107 धावांनी जिंकला (Won By 107 Runs) आहे. तसेच मालिकेत 1-0ने आघाडीही घेतली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ऍश्टन एगरने (Ashton Agar) हॅट्रिक घेत मोठा विक्रम केला आहे. तसेच या सामन्यात त्याने 4 षटकात 24 धावा देत हॅट्रिकसह सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आहेत.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये हॅट्रिक घेणारा ऑस्ट्रेलियाचा दुसराच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने (Brett Lee) केली होती. ब्रेट लीने 13 वर्षांपूर्वी 2007मध्ये बांगलादेशविरुद्ध केपटाऊनला झालेल्या सामन्यात 17 व्या षटकात हॅट्रिक घेतली होती.

काल पार पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 197 धावांचा पाठलाग करत असताना एगरने 8 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis), पाचव्या चेंडूवर अँडिले फेहलुक्वायो (Andile Phehlukwayo) आणि सहाव्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला (Dale Steyn) बाद करत आपली हॅट्रिक साजरी केली.

तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये हॅट्रिक घेणारा जगातील एकूण 12 वा गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर ही हॅट्रिक घेतल्यानंतर त्याने 12 व्या षटकात पीजे बिलजोन आणि 14 व्या षटकात लुंगी एन्गिडीलाही बाद केले. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये एका डावात 5 विकेट्स घेणाराही ऑस्ट्रेलियाचा दुसराच गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी जेम्स फॉकनरने पाकिस्तानविरुद्ध मोहाली येथे 27 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

कालच्या सामन्यात एगरबरोबरच ऍडम झंपा आणि पॅट कमिंसने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्कने 1 विकेट घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद 89 धावाच करता आल्या. 

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 196 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. तर कर्णधार ऍरॉन फिंचने 42 धावांची खेळी केली.

आता दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा आंतरराष्ट्रीय टी20 सामना रविवारी (23 फेब्रुवारी) पोर्ट एलिझाबेथ (Port Elizabeth) येथे पार पडणार आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1231075089308901377

https://twitter.com/Maha_Sports/status/1231061182099881984

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---