Sri Lanka Cricket Team Announced: श्रीलंका क्रिकेट असोशिएशनने कसोटी कर्णधाराची निवड केली आहे. अनेक दिग्गज खेळाडूंच्या नावाची चर्चा असताना कर्णधारपदाची माळ धनंजय डि सिल्वा याच्या गळ्यात पडली आहे. तो श्रीलंकेचा 18वा कसोटी कर्णधार ठरला आहे. काही दिवसांपुर्वीच मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी लंकेने आपल्या कर्णधारांची घोषणा केली होती. यामुळे श्रीलंकेला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तीन वेगळे कर्णधार मिळाले आहेत.
32 वर्षीय धनंजय डि सिल्वाने 2016 मध्ये पल्लेकल इथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 51 कसोटी सामन्यांत लंकेचे प्रतिनीधित्व केले आहे. एक अष्टपैलू क्रिकेटर असलेल्या डि सिल्वाने 91 डावांत 3301 धावा आणि 34 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडे संघाचा तो नियमीत सदस्य आहे.
सध्या लंकेचे वनडे कुसल मेंडिस, (Kusal Mendis) टी20मध्ये वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) तर कसोटीत धनंजय डि सिल्वा (Dhananjay de Silva) कर्णधारपद भुषवत आहे. मेंडिस सध्या 28 वर्षांचा असून 121 वनडे खेळला आहे तर 28 वर्षीय हसरंगाने 58 टी20 सामने खेळले आहेत.
लंका निवड समितीचे अध्यक्ष उपुल थरंगा (Upul Tharanga) यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत कसोटी कर्णधाराची घोषणा केली. यापुर्वी दिमुथ करुनारत्नेकडे कर्णधारपदाची जबाबदारी होती. त्याने 30 कसोटी सामन्यात लंकेचे नेतृत्त्व केले. परंतू काही दिवसांपुर्वीच त्याने कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. करुनारत्नेच्या नेतृत्त्वाखाली लंकेने कसोटीत 12 विजय व 12 पराभव पाहिले तर 6 कसोटी सामने अनिर्णित राहिले.
दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) 2019मध्ये श्रीलंकेच्या कसोटी पदाची धुरा साभाळली होती. लंकेचे सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्त्व करण्यात करुणारत्ने पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. 2021-22 हंगामात त्यांनी 2-0ने विजय मिळवला होता.
करुणारत्नेने कर्णधारापदाच्या कार्यकाळात 30 सामन्यात 49.86 च्या सरासरीने 2643 धावा केल्या. या दरम्यान त्याने आठ शतकं आणि 12 अर्धशतके लगावली. कर्णधार म्हणून त्याने पाकिस्तानविरुद्ध आपली शेवटची कसोटी मालिका खेळली. त्या मालिकेत पाकिस्ताने श्रीलंकेचा 2-0 ने पराभव केला.
धनंजय डि सिल्वा याची कसोटीतील खरी कसोटी 6 फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याने होईल. (Havoc of Sri Lanka Cricket Board, 3 new captains selected in 3 types of cricket)
हेही वाचा
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत डेव्हिड वॉर्नर दिसणार नव्या भूमिकेत, करणार ‘हे’ काम
Ranji Trophy; आदित्य ठाकरे विदर्भाकडून खेळणार रणजी सामने, पाहा विदर्भाचा 16 सदस्यीय संघ





