भारतीय संघानं तब्बल 13 वर्षांनंतर आयसीसी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. टीम इंडियानं शेवटचा वर्ल्ड कप 2011 मध्ये जिंकला होता. त्यानंतर ‘मेन इन ब्लू’ संघ 2014 टी20 विश्वचषक आणि 2023 एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला, परंतु संघाचं ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. अखेर राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं हा दुष्काळ संपवला.
कोणत्याही संघाच्या विजयात कर्णधार किंवा खेळाडू सर्वांच्या लक्षात राहतात. पण पडद्यामागे खेळाडूंना तयार करण्याचं सर्वात मोठं काम संघाचे मुख्य प्रशिक्षक करतात. 2024 च्या टी20 विश्वचषकात कर्णधार रोहित शर्मानं मैदानावर जेवढी व्यूहरचना रचली होती, त्यामध्ये त्याला मैदानाबाहेर बसून मदत करणारा राहुल द्रविड होता.
भारतीय संघानं आतापर्यंत 4 विश्वचषक जिंकले आहेत. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला, हे चारही विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचं योगदान असणाऱ्या मुख्य प्रशिक्षकांबद्दल सांगणार आहोत.
(1) पीआर मानसिंग – भारतीय संघानं 1983 मध्ये पहिल्यांदा विश्वचषकावर कब्जा केला होता. 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव यांनी टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. तर संघाचे व्यवस्थापक माजी क्रिकेटपटू पीआर मानसिंग होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भाग घेतला. मान सिंग 1983 नंतरही टीम इंडियाशी जोडले गेले होते. 1987 च्या विश्वचषकात त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता.
(2) लालचंद राजपूत – धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 2007 साली पहिल्यांदा टी20 विश्वचषक जिंकला होता. तेव्हा संघाचे मुख्य प्रशिक्षक लालचंद राजपूत होते. राजपूत यांच्या देखरेखीखाली टीम इंडियाला 25 वर्षांनंतर आयसीसीचं जेतेपद पटकावण्यात यश आलं. लालचंद राजपूत यांच्याकडे भारतासाठी 2 कसोटी आणि 4 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे.
(3) गॅरी कर्स्टन – भारतीय संघानं 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. तेव्हा महेंद्रसिंह धोनी भारताचा कर्णधार होता. गॅरी कर्स्टन यांच्या करिष्माई कोचिंगखाली भारतीय संघानं अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता.
(4) राहुल द्रविड – आता टीम इंडियानं कोच राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली चौथ्यांदा विश्वचषक जिंकला आहे. द्रविड यांच्या कोचिंगमध्ये भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला होता. पण दोन्ही वेळा संघ विजेतेपदाला मुकला. यावेळी मात्र त्यांनी तसं होऊ दिलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
3 खेळाडू जे भारताच्या टी20 संघात विराट कोहलीची जागा घेऊ शकतात
रोहितच्या अनोख्या सेलिब्रेशनचं ‘मेस्सी’शी कनेक्शन! या खेळाडूनं दिलं होतं खास ट्रेनिंग
सूर्यकुमार यादवच्या एका कॅचमुळे फिरला सामना! जय शाहंच्या हस्ते मिळाला विशेष पुरस्कार