2024 टी20 विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी फारच खराब राहिली. गतवेळचा उपविजेता पाक संघ यंदा सुपर 8 मध्येही पोहचू शकला नाही. यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंवर मायदेशात जोरदार टीका होत आहे. अनेक माजी खेळाडूंनी तर कर्णधार बाबर आझमसह संघातील स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हरिस रौफ याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील आहे. व्हिडिओमध्ये हरिस रौफ चक्क एका चाहत्याच्या अंगावर धावून जाताना दिसतोय. हरिस रौफला हा चाहता काहीतरी म्हणतो, ज्यानंतर तो चाहत्याच्या अंगावर धावून जातो. यावेळी त्याची चाहत्यासोबत बाचाबाची देखील होते. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
A heated argument between Haris Rauf and a fan in the USA. pic.twitter.com/d2vt8guI1m
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 18, 2024
टी20 विश्वचषकात जरी पाकिस्तानच्या संघाची कामगिरी निराशाजनक राहिली असली, तरी हरिस रौफनं शानदार गोलंदाजी केली. त्यानं खेळलेल्या 4 सामन्यांमध्ये 7 बळी घेतले. तो विश्वचषकात पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद आमिरसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे.
2024 टी20 विश्वचषकात हरिस रौफनं 14.42 ची सरासरी आणि 6.73 च्या उत्कृष्ट इकॉनॉमीनं गोलंदाजी केली. 21 धावा देऊन 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली, जी त्यानं भारताविरुद्ध केली होती.
हरिस रौफ पाकिस्तानकडून आतापर्यंत 72 टी20 सामने खेळला आहे. या दरम्यान त्यानं 20.93 ची सरासरी आणि 8.16 च्या इकॉनॉमी रेटनं 102 विकेट घेतल्या आहेत. 17 धावा देऊन 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकात मॅच फिक्सिंगचा प्रयत्न? युगांडाच्या खेळाडूची आयसीसीकडे तक्रार
भारतासह हे 12 संघ टी20 विश्वचषक 2026 साठी पात्र; सुपर-8 साठी पात्र न झालेल्या पाकिस्तानचं भविष्य काय?
ट्रेंट बोल्टचा टी20 विश्वचषकाला निरोप! अखेरच्या सामन्यात केली जबरदस्त गोलंदाजी