fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आयएसएलच्या पाचव्या मोसमाचा संपुर्ण आढावा

मुंबई | हिरो इंडियन सुपर लिगचा (आयएसएल) पाचवा मोसम संपला आहे. बेंगळुरू एफसीने विजेतेपद मिळविले, तर गतविजेता चेन्नईयीन एफसी अखेरच्या क्रमांकावर फेकला गेला. सहभागी दहा संघांच्या कामगिरीचा आढावा ः
 
बेंगळुरू एफसी ः विजेतेपदाची क्षमता सिद्ध
 
गेल्या मोसमात अल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगळुरूने अंतिम फेरी गाठली. यावेळी कार्लेस कुआद्रात यांच्याकडे सुत्रे आल्यानंतर सरस कामगिरी अपेक्षित होती. त्यासाठी जेतेपदच आवश्यक होते. कुआद्रात यांनी मुळातच आकर्षक असलेली शैली आणखी पूरक बनविली. मैदानावर आणखी सकारात्मक खेळ करणारा संघ त्यांनी बांधला. संघभावना, लढाऊ वृत्ती आणि गुणवत्तेच्या जोरावर बेंगळुरूचा संघ बहरला. एफसी गोवाला हरवून त्यांनी थाटातच जेतेपद मिळविले.
 
एफसी गोवा ः आकर्षक व मनोरंजक खेळ
 
भारतीय फुटबॉलमध्ये गोव्याच्या संघांनी नेहमीच लौकीक निर्माण केला आहे. एफसी गोवाने दोन मोसमांच्या कालावधीत आपली खास शैली निर्माण केली. प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी नव्या मोसमासाठी बहुतांश खेळाडू कायम राखले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली  खेळाडूंनी स्पॅनीश शैली आत्मसात केली. ढिसाळ बचाव हीच मागील मोसमातील उणीव होती. त्यामुळे एफसी गोवाची पिछेहाट होत होती. लॉबेरा यांनी ही त्रुटी दूर केली. त्यासाठी मौर्तडा फॉल आणि कार्लोस पेना अशी जोडी जमविण्यात आली. मंदार राव देसाई याला लेफ्ट-बॅक बनविण्याचा धाडसी निर्णयही घेण्यात आला. ह्युगो बौमौस याला बदली खेळाडू म्हणून परिणामकारक पद्धतीने वापरण्यास चांगली फळे मिळाली. गोवा अंतिम फेरी कमी पडला असेल पण त्यांच्यासाठी हा मोसम संस्मरणीय ठरला.
 
मुंबई सिटी एफसी ः स्थिरावलेला संतुलीत संघ
 
मुंबईच्या बाद फेरीतील वाटचालीत परदेशी खेळाडूंचे योगदान मोठे होते. संथ सुरवातीनंतर खेळाडूंनी खेळ उंचावला आणि बाद फेरीत प्रवेश केला. या वाटचालीत एफसी गोवाविरुद्ध झालेला 1-5 असा पराभव निर्णायक ठरला. त्यानंतरच मुंबईचे खेळाडू खडबडून जागे झाले. संघाचा गाभा कायम राखला तर या संघाचे भवितव्य उज्ज्वल असेल.
 
नॉर्थइस्ट युनायटेड एफसी ः सामान्य संघाची असामान्य कामगिरी
 
एल्को शात्तोरी यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थइस्टला खेळाडूंच्या दुखापती आणि निलंबनामुळे झगडावे लागले. खास करून बचावात त्यांना फटका बसला. यानंतरही संघभावना आणि उपलब्ध खेळाडूंच्या योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर संघात जान निर्माण झाली. ताण पडूनही या संघाने प्रथमच बाद फेरी गाठून एतिहासिक कामगिरी केली. मोक्याच्या टप्यात मात्र मिस्लाव कोमोर्स्की, बार्थोलोम्यू ओगबेचे, रॉलीन बोर्जेस, फेडेरीको गॅलेगो अशा खेळाडूंना दुखापती झाल्या. त्यामुळे नॉर्थइस्टची पिछेहाट झाली. आता पुढील मोसमाच्या तयारीसाठी वेळ मिळणार असल्यामुळे यंदाच्या सकारात्मक कामगिरीनंतर आणखी मोठ्या यशाचे स्वप्न नॉर्थइस्ट पाहू शकेल.
 
जमशेदपूर एफसी ः कामगिरी खराब नाही, पण पुरेशी चांगली सुद्धा नाही
 
जमशेदपूर एफसीला आश्वासक सुरवातीनंतर जास्त बरोबरी पत्कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांची बाद फेरीची संधी हुकली. अखेरपर्यंत पहिल्या चार संघांसाठी त्यांचे आव्हान कायम होते. त्यांच्या संघात गुणवत्ता होती. मायकेल सुसैराज आणि टिरी यांनी चांगला खेळ केला. सुसैराजने पदार्पणात प्रभाव पाडला. टीम कॅहील आणि सर्जिओ सिदोंचा यांना दुखापतींचा फटका बसला, पण मारीओ आर्क्वेस आणि मेमो यांनी मध्य फळीत भक्कम भागिदारी निर्माण केली. बाद फेरी हुकणे मात्र या संघासाठी निराशाजनक ठरले.
 
एटीके ः आशा उंचावून अखेरीस निराशा
 
एटीकेच्या संघात अनेक स्टार होते. त्यांचे राखीव खेळाडू सुद्धा इतर कोणत्याही क्लबकडे मुख्य संघात स्थान मिळविण्याच्या दर्जाचे होते, पण दुखापतींमुळे गेल्या मोसमापासून सुरु झालेला ताप यावेळीही कायम राहिला. गोल करणाऱ्या खेळाडूंची उणीव त्यांना भासली. बचाव फळीत मात्र स्टीव कॉपेल यांच्या संघाला आंद्रे बिके आणि जॉन जॉन्सन यांच्यामुळे चांगली साथ मिळाली. एमिलीयानो अल्फारो आणि कालू उचे या स्ट्रायकर्सना झालेल्या दुखापती पाहता कॉपेल यांना नियोजनात बदल करावा लागला. एदू गार्सिया आणि मॅन्युएल लँझरॉत यांना सातत्य राखता आले नाही. कोमल थातल आणि अंकित मुखर्जी या दोन गुणवान खेळाडूंचा उदय एटीकेसाठी उल्लेखनीय ठरला.
 
एफसी पुणे सिटी ः वेळीच सावरण्यात अपयश
 
मोसमाच्या प्रारंभी तीनच सामने झाल्यानंतर पुणे सिटीला प्रशिक्षक बदलावे लागले. निर्णायक विजय मिळविण्यात हा संघ झगडत होता. त्यामुळे मोहीमेला गती अशी येत नव्हती. हंगामी प्रशिक्षक प्रद्युम्न रेड्डी यांच्या चांगल्या प्रयत्नांमुळे संघ स्थिरावला. हिवाळी ब्रेकच्या सुमारास फिल ब्राऊन यांच्याकडे सुत्रे आली. अखेरच्या आठ सामन्यांत पुण्याचा एकच पराभव झाला. बाद फेरीसाठी झुंजण्याची क्षमता या संघाने दाखवून दिली. यामुळे पुढील मोसमासाठी हा संघ आतूर असेल.
 
दिल्ली डायनॅमोज ः तरुण, उत्साही संघाकडून निराशा
 
दिल्लीची सुरवात संथ होती. खेळाडूंना नवे प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांच्या शैलीशी जुळवून घेण्यास वेळ लागला. अखेरीस हे घडले तेव्हा संघाची गुणतक्त्यात पिछेहाट झाली होती. तरुण खेळाडूंच्या संघाने उत्साहाच्या जोरावर दुसऱ्या टप्यात चांगला खेळ केला. लालीयनझुला छांगटे, नंदकुमार शेखर, डॅनिएल लालह्लीम्पुईया आणि विनीत राय अशा खेळाडूंसह गोम्बाऊ यांनी संघाचा पाया रचल्याचे दिसते. पुढील मोसमात या संघाने गुणवत्तेचे कामगिरीत रुपांतर करायला हवे. हा संघ भविष्यासाठी चांगला तयार झाला आहे.
 
केरळा ब्लास्टर्स ः पाठोपाठ निराशा
 
मागील मोसमात बाद फेरी हुकल्यानंतर ब्लास्टर्सने नव्या आशेने सुरवात केली होती. सलामीला एटीकेविरुद्ध विजय मिळविल्यानंतर मात्र या संघाचे निकाल घसरले. 14 सामन्यांत त्यांना विजय मिळविता आला नाही. तेथेच त्यांच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या. त्यांना दोनच विजय मिळविता आले. गोलांचा अभाव आणि पास हेरू शकेल अशा कल्पक खेळाडूची उणीव ब्लास्टर्सला भोवली. त्यामुळे हा संघ नवव्या क्रमांकावर फेकला गेला. साहल अब्दुल समाद हाच खेळाडू त्यांच्यासाठी आशास्थान ठरला. त्याने मध्य फळीतून चमक दाखविली. त्यामुळे त्याला मोसमातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
 
चेन्नईयीन एफसी ः विजेते ते तळात इतकी टोकाची कामगिरी
 
जेतेपद राखण्याच्या मोहीमेला अपयशी सुरवात झाल्यानंतर जॉन ग्रेगरी यांचा संघ कधीच सावरू शकला नाही. त्यांना दोनच साने जिंकता आले. यातील पहिला विजय सहा सामने झाल्यानंतर मिळाला, तर दुसरा विजय तीन सामने बाकी असताना मिळाला. चेन्नईयीनच्या आक्रणात काहीही सफाई नव्हती. हा गतविजेता संघ मैदानावर अपेक्षित खेळ करू शकला नाही. हेन्रीक सेरेनोने क्लब सोडणे व धनपाल गणेशच्या दुखापतीमुळे त्यांना झगडावे लागले. ग्रेगरी यातून मार्ग काढू शकले नाहीत. बचाव ढिसाळ असताना जेजे लालपेखलुआ आणि कंपनी गोल करू शकत नव्हती. त्यामुळे हा गतविजेता संघ अखेरच्या स्थानावर फेकला गेला.
You might also like