आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रथमच सुरू केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना एजबॅस्टन येथील रोज बाऊल मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळला जात आहे. कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याने आयसीसीने २०१९ पासून क्रमवारीत अव्वल ९ संघां दरम्यान ही स्पर्धा सुरू केली. जवळपास दोन वर्ष सुरू राहिलेल्या या स्पर्धेमध्ये काही खेळाडूंनी आपल्या कामगिरीने चाहत्यांकडून कौतुक वसूल करून घेतले. आज आपण याच चॅम्पियनशिपमध्ये फलंदाजीत सर्वाधिक सरासरी राखणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.
१) मार्नस लॅब्युशेन-
ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लॅब्युशेन हा या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज बनला. सोबतच त्याने सर्वोत्तम सरासरी देखील राखली. त्याने १३ सामन्यात ७२.८२ च्या सरासरीने १६७५ धावा बनवल्या.
२) बाबर आझम-
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक सरासरी राखणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. बाबरने ६६.५७ च्या उत्तम सरासरीने ९३२ धावांचे योगदान दिले.
३) रोहित शर्मा-
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा हा भारतासाठी सर्वोत्तम सरासरी राखणारा फलंदाज बनला. रोहितने आपल्या फलंदाजीची कमाल दाखवत ११ सामन्यात ६४.३७ च्या लाजवाब सरासरीने १०३० धावा ठोकल्या.
४) स्टीव्ह स्मिथ-
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. त्याने स्पर्धेदरम्यान ६३.८५ च्या सरासरीने ऑस्ट्रेलियासाठी १३४१ धावांचे योगदान दिले.
५) धनंजया डी सिल्वा-
श्रीलंकेचा भरवशाचा फलंदाज धनंजया डी सिल्वा हा यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. श्रीलंका संघ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करू शकला नसला तरी, डी सिल्वाने ५९.३६ च्या उत्तम सरासरीने ६५३ धावा आपल्या नावे केल्या.
६) रविंद्र जडेजा-
भारताचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा हादेखील या यादीमध्ये समाविष्ट आहे. जडेजाने स्पर्धेदरम्यान ४६९ धावा बनविल्या असल्या तरी, त्याची सरासरी ५८.६२ अशी राहिली. त्याने स्पर्धेमध्ये १० सामन्यात सहभाग नोंदवला.
७) केन विलियम्सन-
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत मजल मारणाऱ्या न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा देखील या यादीमध्ये सामील आहे. विलियम्सनने स्पर्धेमध्ये ९ सामने खेळून ५८.३५ अशी सरासरी राखत ८१७ धावा बनविल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! आयपीएलच्या आयोजनासाठी ‘या’ मोठ्या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल
‘लेडी सेहवाग’ की ‘लेडी द वॉल’? शेफालीच्या धुव्वाधार प्रदर्शनात चाहत्यांना दिसली द्रविडची झलक