भारत आणि इंग्लंड संघादरम्यान 5 फेब्रुवारीपासून 4 कसोटी सामन्यांची बहुप्रतिक्षित कसोटी मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध व इंग्लंडने श्रीलंकाविरुद्ध मालिका विजय मिळवलेला असल्याने दोन्ही संघांमध्ये आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट रसिकांना एक उत्कंठावर्धक मालिका बघायला मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे.
तसेही इंग्लंडने प्रत्येक वेळी भारतामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. 2004 नंतर इंग्लंड एक मात्र संघ आहे ज्याने भारतात मालिका विजय मिळवला. इंग्लंडने 2012 साली झालेल्या मालिकेत भारताचा 2-1ने पराभव केला होता. तर 2016 साली झालेल्या मालिकेत देखील उत्तम कामगिरी केली होती. मात्र त्यांना या मालिकेत विजय मिळवता आला नव्हता. आपण या लेखात, 2016 साली झालेल्या कसोटी मालिकेतील इंग्लंड फलंदाजांद्वारे खेळल्या गेलेल्या टॉप 4 खेळींविषयी बघणार आहोत.
इंग्लंडच्या फलंदाजांनी केलेल्या सर्वोच्च वैयक्तिक खेळी-
4) किटन जेनिग्ज – 112 धावा
2016 मालिकेत कुठलीही शंका न घेता सर्वोत्तम खेळी ठरली ती सलामीवीर किटन जेनिग्ज याची. जेनिग्जने पहिल्यांदाच भारतात खेळत असताना देखील मैदानावर ज्याप्रकारे आत्मविश्वास दाखवला; तो खरोखरच सर्व क्रिकेट रसिकांच्या कायम स्मरणात राहील. वानखेडे येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात जेनिग्जने 219 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 112 धावांची खेळी केली होती. जेनिग्जच्या या खेळीचे तेव्हा संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक झाले होते.
3) जो रुट – 124 धावा
2016 साली झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने फिरकीला अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले होते. इंग्लंडच्या या यशाचे मुख्य कारण होते ते रुटचे पहिल्या डावातील शानदार शतक. रुटने राजकोटच्या खेळपट्टीवर 180 चेंडूत शानदार 124 धावांची खेळी केली होती. रुटने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला होता. रुटच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी ही एक खेळी मानली जाते.
2) बेन स्टोक्स – 128 धावा
रुट प्रमाणेच बेन स्टोक्सने देखील 2016 मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार शतकीय खेळी केली होती. स्टोक्सने 235 चेंडूत 13 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 128 धावा बनवल्या होत्या. मालिकेपूर्वी स्टोक्सच्या भारतातील कामगिरीकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र स्टोक्सने पहिल्याच सामन्यात शतक झळकावत आपले कौशल्य दाखवून दिले.
1) मोईन अली – 146 धावा
2016 सालच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना चेन्नई येथे खेळला गेला होता. मालिकेत 3-0 ने पिछाडीवर असल्याने इंग्लंडचा संघ पाचव्या सामन्यात मोठ्या दबावात होता. मात्र इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीने सर्व दबाव झुगारत एक आक्रमक शतकीय खेळी केली. अलीने 262 चेंडूत 13 चौकार व 1 षटकारासह 146 धावा केल्या होत्या. ही त्या कसोटी मालिकेतील कोणत्या इंग्लंडच्या फलंदाजाने केलेली सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली होती.
संबंधित लेख-
भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत केवळ ‘या’ दोन खेळाडूंनाच करता आली त्रिशतकी खेळी
कमालीच्या फॉर्ममध्ये आहे ‘हा’ इंग्लंडचा खेळाडू; भारतीय संघासाठी ठरु शकतो सर्वात धोकादायक
टॉप ४ : भारताविरुद्ध २०१२ सालच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या खेळाडूंनी केलेल्या अविस्मरणीय खेळी