इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये खेळाडूंनी धावांचा नुसता पाऊस पाडला आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स मोईन अली याचाही समावेश आहे. अलीने शुक्रवारी (दि. २० मे) आयपीएलच्या १५व्या हंगामातील ६८व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्येच अर्धशतक झळकावले. यासोबतच तो पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला.
नाणेफेक जिंकत चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने या सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) अवघ्या ३ धावांवर तंबूत बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला मोईल अली (Moeen Ali) आला. त्याने येता क्षणीच पॉवरप्लेमध्ये चौकार आणि षटकारांची बरसात करत धावा चोपण्यास सुरुवात केली. त्याने अवघ्या २१ चेंडूत ५९ धावा केल्या. विशेष म्हणजे, त्याने सहाव्या षटकात एकही एकेरी किंवा दुहेरी धाव घेतली नाही. त्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर पुढील पाचही चेंडूंवर चौकार मारले. यामुळे तो आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज बनला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सुरेश रैना (Suresh Raina) अव्वलस्थानी आहे. रैनाने पॉवरप्लेमध्ये ८७ धावा चोपल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऍडम गिलख्रिस्ट आहे. त्याने ७४ धावा केल्या होत्या. त्यानंतर ६३ धावांसह तिसऱ्या स्थानी इशान किशन, ६२ धावांसह चौथ्या क्रमांकावर डेविड वॉर्नर, संयुक्तरीत्या पाचव्या स्थानी ५९ धावांसह मोईन अलीसोबत जॉनी बेअरस्टो, डेविड वॉर्नर, सनथ जयसूर्या आहे. त्यानंतर सहाव्या स्थानी केएल राहुल आहे. त्याने पॉवरप्लेमध्ये ५५ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त ५४ धावांसह सुनील नारायण सातव्या स्थानी आहे.
आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
८७ धावा- सुरेश रैना
७४ धावा- ऍडम गिलख्रिस्ट
६३ धावा- ईशान किशन
६२ धावा- डेविड वॉर्नर
५९ धावा- मोईन अली*
५९ धावा- जॉनी बेअरस्टो
५९ धावा- डेविड वॉर्नर
५९ धावा- सनथ जयसूर्या
५५ धावा- केएल राहुल
५४ धावा- सुनील नारायण