बरोबर २४ वर्षांपुर्वी म्हणजेच २२ जून १९९६ रोजी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने लाॅर्ड्सवर खणखणीत शतकी खेळी केली होती. पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करणारा तो ९वा भारतीय फलंदाज ठरला होता. तर इंग्लंडविरुद्ध पदार्पणात शतक करणारा ५वा फलंदाज.
गांगुलीचे शतक यासाठी महत्त्वाचे होते, कारण त्याचे पहिल्याच कसोटी सामन्यात लाॅर्ड्सवर हा कारनामा केला होता. ३०१ चेंडूत त्याने २० चौकारांच्या मदतीने त्याने १३१ धावा केल्या होत्या.
आजपर्यंत भारताकडून पदार्पणात शतकी खेळी करण्याचे भाग्य १५ खेळाडूंना लाभले आहे. १५ पैकी ६ खेळाडूंनी परदेशात तर ९ खेळाडूंनी मायदेशात शतके केली आहेत.
यातील एजी क्रिपाल सिंग हे तर पदार्पणाच्या सामन्यातच १०० धावांवर नाबाद राहिले. पदार्पणात शतकी खेळी करत नाबाद राहिलेले ते एकमेव भारतीय फलंदाज.
पदार्पणाच्या सामन्यात मोहम्मद अझरुद्दीनने ३२२ तर सौरव गांगुली व रोहित शर्माने प्रत्येकी ३०१ चेंडू खेळले होते. पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करताना सर्वाधिक कमी चेंडू (१७३) खेळण्याचा विक्रम सेहवागच्या नावावर आहे.
तर पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करताना शिखर धवन व सुरेश रैनाने प्रत्येकी २ तर रोहित शर्मा व सुरेंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी एक षटकार मारला होता.
पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करताना तब्बल ३३ चौकार मारण्याचा पराक्रम शिखर धवनने केला होता. पदार्पणाच्या सामन्यात १०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा करणारा शिखर एकमेव भारतीय फलंदाज आहे.
पदार्पणाच्या सामन्यात भारताकडून पहिले शतक १९३३ साली लाला अमरनाथ यांनी केले होते. तर भारताकडून पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करणारा पृथ्वी शाॅ शेवटचा खेळाडू आहे.
कसोटी पदार्पणात एका डावात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज-
187 धावा – शिखर धवन (ऑस्ट्रेलिया विरुद्ध,मोहाली, 2013)
177 धावा – रोहित शर्मा (विंडिज विरुद्ध, कोलकता, 2013)
137 धावा – गुंडप्पा विश्वनाथ (ऑस्ट्रेलिया विरुद्ध, कानपूर, 1969)
134 धावा – पृथ्वी शॉ (विंडिज विरुद्ध, राजकोट, 2018)
131 धावा – सौरव गांगुली (इंग्लंड विरुद्ध, लॉर्ड्स, 1996)