आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बुधवारी (१० नोव्हेंबर) या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. इंग्लंड संघाची कामगिरी पाहता, इंग्लंड संघाला या सामन्यात विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु न्यूझीलंड संघातील फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर करत अंतिम फेरीत धडक दिली. यासह मोठ्या विक्रमाला देखील गवसणी घातली आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ शेवटच्या वेळी २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमनेसामने आले होते. या सामन्यात इंग्लंड संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. त्यामुळे या सामन्यात न्यूझीलंड संघाला इंग्लंड संघाला पराभूत करून बदला घेण्याची सुवर्णसंधी होती. याच संधीचा फायदा घेत, न्यूझीलंड संघाने १६७ धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि अबूधाबीच्या मैदानावर मोठा विक्रम केला आहे. न्यूझीलंड संघाने अबूधाबीच्या मैदानावर सर्वाधिक धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करणाऱ्या संघांच्या यादीत अव्वल स्थान गाठले आहे.या यादीत दुसऱ्या स्थानी नामिबिया संघ आहे. नामिबिया संघाने देखील याच टी२० विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्स संघाला पराभूत केले होते.
अबूधाबीच्या मैदानावर टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करणारे संघ
१६७ धावा – न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, २०२१*
१६५ धावा – नामिबिया विरुद्ध नेदरलँड, २०२१
१६३ धावा – हाँगकाँग विरुद्ध अफगानिस्तान, २०१५
१५८ धावा – ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज, २०२१
१५४ धावा – आयर्लंड विरुद्ध हाँगकाँग, २०१९
१५० धावा – हाँगकाँग विरुद्ध ओमान, २०१५
या मोठ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीने नाबाद ५१ धावांची तुफानी खेळी केली. तर डेविड मलानने ४१ आणि जोस बटलरने २९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाला २० षटकाअखेर ४ बाद १६६ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाकडून डॅरील मिशेलने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर डेवॉन कॉनवेने ४६ धावांचे महत्वपूर्ण योगदान देत हा सामना न्यूझीलंड संघाला जिंकून दिला. न्यूझीलंड संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.






