टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि लाखो चाहत्यांचा हिटमॅन रोहित शर्मा (Team india’s former Captain Rohit Sharma) लवकरच वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार की त्याला संघातून डच्चू दिला जाणार, याबाबत सध्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या 15-16 तासांपासून अशा अनेक बातम्या येत आहेत. मात्र, रोहितने स्वतः यावर काहीही भाष्य केलेले नाही किंवा बीसीसीआयनेही कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. हे निश्चित आहे की, रोहित शर्मा लॉर्ड्सवर होणारा वनडे सामना खेळणार आहे. या सामन्यात तो विराट कोहलीसोबत (King kohli) एक नवा इतिहास रचणार आहे.
जेव्हा हे दोन्ही खेळाडू मैदानात उतरतील, तेव्हा त्यांच्या एकत्र कारकिर्दीतील हा 400 वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. सध्या रोहित शर्मा इंग्लंडमध्ये वनडे मालिका खेळत आहे. आतापर्यंत दोन सामने झाले आहेत, त्यापैकी पहिला भारताने जिंकला, तर दुसरा इंग्लंडने जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या दोन्ही सामन्यांत रोहितच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत आणि तो आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीतही दिसला नाही.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितने 21 चेंडूत 11 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 47 चेंडूत 26 धावांची संथ खेळी केली. याच दरम्यान अशी चर्चा सुरू झाली की, या मालिकेतील तिसरा सामना रोहितचा शेवटचा सामना असेल. बीसीसीआयने (BCCI) त्याच्याशी चर्चा केली असून, आता त्याला भविष्यातील योजनांमध्ये विचारात घेतले जात नाही, अशा बातम्या येत आहेत. म्हणजेच रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा हा शेवट असेल.
मात्र, या चर्चांना अद्याप तरी कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हे सर्व सध्या केवळ तर्कवितर्क आहेत. रोहित आणि विराट लॉर्ड्सवर जेव्हा मैदानात उतरतील, तेव्हा हा त्यांचा एकत्र 400 वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दोन खेळाडूंनी एकत्र इतके सामने खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे दोन्ही खेळाडू आतापर्यंत 399 सामने एकत्र खेळले आहेत.
जर ते अजूनही कसोटी आणि टी20 फॉरमॅटमध्ये खेळत असते, तर हा विक्रम त्यांनी खूप आधीच रचला असता. विराट कोहली आणि रोहित शर्मा ही भारतासाठी एकत्र सर्वाधिक सामने खेळणारी जोडी आहे. काही काळापूर्वीच त्यांनी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड (391 सामने) यांचा विक्रम मोडला आहे. राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी एकत्र 369 सामने खेळले आहेत. जागतिक स्तरावर बोलायचे झाले तर, श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी एकत्र 550 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यांचा विक्रम मोडणे तसे कठीण आहे.
लॉर्ड्सचा सामना रोहितचा शेवटचा सामना असेल की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण हे नक्की की, लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात रोहित आणि विराट एक असा विक्रम रचणार आहेत, जो मोडणे कोणत्याही भारतीय जोडीसाठी भविष्यात सोप नसणार आहे.






